भाजपच्या माजी नगरसेविकेचे आयुक्तांकडे विविध प्रस्ताव
ठाणे : ठाणे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असून याच स्मार्ट सिटीचा भाग म्हणून ठाण्याचे प्रवेशद्वारावर संपूर्ण शहराची ओळख सांगणारी एका आर्ट गॅलरीची निर्मिती करावी असा महत्वाचा प्रस्ताव भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सादर केला आहे.
या आर्ट गॅलरीमध्ये संपूर्ण ठाणे शहराचा इतिहास तसेच शहरातील महत्वाच्या वास्तूंची माहिती ठाण्यात प्रवेश करतानाच नागरिकांना व्हावी या दृष्टीने हा प्रस्ताव महत्वाचा असल्याची माहिती भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी दिली आहे.
ठाणे शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय पातळीवर अनेक योजना हातात घेण्यात आल्या आहेत. यामध्ये अनेक मोठ्या प्रकल्पांचा देखील समावेश करण्यात आला आहे. हे सर्व प्रकल्प नियोजित वेळेत कसे पूर्ण होतील यासाठी स्वतः पालिका आयुक्त अभिजित बांगर हे पुढाकार घेत आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीच्या जडणघडणीमध्ये लोकप्रतिनिधीची भूमिका महत्वाची असून या दृष्टीने भाजपच्या माजी नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी पालिका प्रशासनासमोर महत्वाचा प्रस्ताव सादर केला आहे.
प्रतिभा मढवी यांनी दिलेल्या प्रस्तावात ठाणे शहर हे मुंबईला लागूनच शहर असून मुंबईसारख्या भारताची आर्थिक राजधानी असलेल्या शहरात प्रवेश करताना त्याचे प्रतिबिंब ठाण्यातून दिसावे अशी संकल्पना त्यांनी आपल्या प्रस्तावात मांडली आहे. यामध्ये कोणत्याही महामार्गावर प्रवेश करताना फूडमॉल, प्रसाधन गृह, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रामगृह अशा सुविधा चेकनाका परिसरात निर्माण कराव्यात, अशा सूचना आपल्या प्रस्तावात नमूद केल्या आहेत. या सुविधा जर ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांना मिळाल्या तर ठाणे खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल असा विश्वास त्यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून मढवी यांनी व्यक्त केला आहे.