जिल्ह्याची अर्थव्यवस्था पाच वर्षांत १५० बिलियन डॉलर होणार

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

ठाणे: ठाणे जिल्ह्याचे एकूण अर्थव्यवस्थेतले योगदान 48 बिलियन डॉलरचे आहे. 2030 पर्यंत ते 150 बिलियन डॉलर इतके करण्याचे ठरविले आहे. सर्वात मोठे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं महानगर म्हणून ठाण्याची ओळख करायची आहे. ठाणे हे विकासाचं खणखणीत नाणं आहे, हे सिद्ध करायचे आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

76 वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

श्री.शिंदे पुढे म्हणाले, एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले विकास प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते. ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे या भागात वाहतु‌कीची कोंडी खूप कमी होणार आहे. सध्याच्या फ्रीवेला छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंदनगरपर्यंत वाढवित आहोत. नवी मुंबईमध्ये मेट्रो धावायला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील अन्य मेट्रो प्रकल्पसुध्दा टप्याटप्प्याने सुरू होतील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता टेक ऑफसाठी सज्ज झाले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ३३ हजार कोटी रुपयांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमीपूजन व उ‌द्घाटन झाल्याने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना वेग येतो आहे. आनंदनगर गायमुख बायपास यांचीही कामे होणार आहेत. कल्याण-शिळ मार्गावरून आता प्रवास अधिक वेगवान होणार आहे. इथल्या उड्डाणपूलांच्या तीन मार्गिका सुद्धा खुल्या केल्यामुळे वाहनांची आता फारशी कोंडी होत नाही. या मार्गाचं सहा पदरीकरण झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. सायन-पनवेल महामार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचे उद्घाटन आणि रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरील सात खाडी पूलांच्या कामांचे भूमीपूजनही मी मुख्यमंत्री असताना झाले आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, दहा हजार घरे आम्ही क्लस्टर योजनेच्या माध्यमातून बांधत आहोत. आशियातली ही सर्वात मोठी क्लस्टर योजना असेल. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतून 26 हजार घरे मिळणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या आवास योजनेत मिळून ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने 16 हजार घरे बांधली आहेत. आवास योजनेमध्ये ठाणे जिल्हा सतत अव्वल राहिला आहे. मुंबईपाठोपाठ आज ठाणे महानगरपालिकेचे नाव घेतले जात असल्याचेही श्री.शिंदे यांनी स्पष्ट केले.

ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा 4.0 अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले आहे. ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती आम्ही दिली आहे. 500 दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. जिल्हा परिषदेच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी झाली आहे. ठाणे ग्रामीण भागात 28 स्मार्ट ग्राम ग्रंथालये सुरू करून आपण तंत्रज्ञानामध्ये सुद्धा मागे नाही आहोत हे दाखवून दिले आहे. पोलीस दलाचे आधुनिकीकरण व वाहतूक विभागाचे बळकटीकरण करायला सुरुवात केली आहे. त्यांच्यासाठी मॉडर्न वाहने खरेदी केली आहेत. पोलीस ठाण्यांमध्ये दामिनी पथक, पोलीस काका, पोलीस दीदी यांची पथके स्थापन केली आहेत. ठाणे पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे अॅप सुरू केले आहे. सुमारे साडे सहा हजार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबईतील महापे इथे महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. केवळ ठाणेच नाही तर जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये नागरिकांना जास्तीत जास्त सेवा जलद आणि पारदर्शी मिळाव्यात आणि नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून संगणकीय प्रणालीवर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

या सोहळ्याच्या निमित्ताने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2022-23 जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, ॲग्री स्टॅक योजनेमध्ये सहभागी झालेल्या व शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले शेतकरी, जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक, उत्कृष्ट सेवा बजावलेले पोलीस अधिकारी-अंमलदार यांचा सन्मान करण्यात आला.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा सन्मान

ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्हा माहिती कार्यालयाने व्यापक प्रसिध्दी दिल्यामुळे शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाचीही प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख आणि इतर विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.