रिक्षाला धडक देऊन डंपर गांधारी नदीत उलटला

रिक्षाच्या चक्काचूर, एका महिलेचा मृत्यू तर दोघे जखमी

कल्याण: कल्याण पश्चिम येथील गांधारी ब्रिजवर मंगळवारी सकाळी डंपर आणि रिक्षा धडकेत रिक्षातील एक महिला मृत्युमुखी तर दोन जण गंभीर जखमी झाले. रिक्षाला धडक देऊन डंपर थेट ब्रिजचे कठडे तोडून नदीमध्ये पडला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील गांधारी ब्रीजवर कल्याणकडून पडघ्याकडे जाणाऱ्या डंपरची बापगावाकडून कल्याणकडे येणाऱ्या रिक्षाची भीषण धडक बसली. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास झालेल्या घटनेत रिक्षाचा चक्काचूर झाला. तर पुलाचा संरक्षक कठडा तोडून डंपर गांधारी खाडी पात्राच्या पाण्यात पडला. या भीषण अपघातात रिक्षामधील रिक्षाचालक निलेश वानखेडे यांची आई मंगल वानखेडे (55) रा. बापगाव जय मल्हारनगर हिचा मृत्यू झाला तर निलेशसह एक महिला जखमी झाली. घटना प्रसंगी आईला वाचवा अशी आर्त हाक पुलावर जमलेल्या नागरिकांना निलेश मारत होता. पण माणुसकी हरपत चाललेल्या या युगात बघे मंडळी मोबाईलद्वारे व्हिडिओ आणि फोटो शूट काढण्यात रंगली होती.

डंपरचालक आजम अली याने उडी मारत स्वतःचा जीव वाचवत थेट पोलीस स्टेशन गाठले असल्याचे समजते. घटनास्थळी तातडीने पोलीस यंत्रणा पोहचली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी खाडी पात्रातील पाण्यात शोधकार्य सुरू केले. घटनास्थळी तहसीलदार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.