शहरातच होणार गाड्यांचे पासिंग
भाईंदर: मीरा-भाईंदर शहरात असलेल्या आरटीओ उपकेंद्राच्या माध्यमातून लवकरच टू व्हिलर, थ्री व्हिलर व फोर व्हिलर गाड्यांच्या पासिंगची सुविधा मीरा-भाईंदरच्या नागरिकांना शहरातच मिळणार आहे.
वाहनांच्या पासिंगसाठी आवश्यक असलेला ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’ मीरा भाईंदर शहरातच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांनी मंजूर झाला असून त्याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मीरा-भाईंदर महापालिकेशी परिवहन आयुक्तांनी चर्चा केली असून महापालिकेने आठवडाभरात ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’साठी जागा उपब्लध करून दिल्यास १ मे पासून मीरा-भाईंदर शहरातच ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’वर टेस्टिंग होऊन मीरा-भाईंदरच्या वाहनांची शहरातच पासिंग सुरु होईल , अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. मीरा-भाईंदरच्या नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
मीरा-भाईंदर शहरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता या शहरामध्ये आरटीओचे उपकेंद्र असावे, अशी मागणी करून राज्यात ठाकरे सरकार आल्यानंतर शहरातील नागरिकांना लर्निंग लायसन्स, लायसन्स देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली होती. गेल्या वर्षी मीरा-भाईंदर शहरातील आरटीओच्या उपकेंद्राचे उद्घाटन अनिल परब यांच्या हस्ते झाले होते. पण आवश्यक जागा नसल्यामुळे व कर्मचारी कमी असल्यामुळे टू व्हिलर, थ्री व्हिलर व फोर व्हिलर गाड्यांच्या पासिंगची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकली नाही. त्यामुळे मीरा^भाईंदर शहरातील नागरिकांच्या मागणीवरून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मीरा-भाईंदरमधील गाड्यांच्या पासिंग संदर्भात आरटीओच्या अधिकाऱ्यांसह एका बैठकीचे आयोजन करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन विधानभवनामध्ये आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मीरा-भाईंदरच्या टेस्टिंग ट्रॅकबद्दल चर्चा करून मंत्र्यांनी कार्यवाहीच्या सूचना दिल्या.
वाहनांच्या पासिंग ट्रॅककरीता जर आम्हाला लवकरात लवकर महापालिकेकडून जागा मिळाली तर आम्ही कर्मचारी लावून पासिंग व्यवस्था मीरा-भाईंदरमध्ये सुरू करू असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. त्यावेळी मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलिप ढोले यांच्याशी परिवहन आयुक्तांनी चर्चा केली. त्यावर या उपकेंद्राच्या बाजूला जे.पी. इंफ्रास्ट्रक्चरच्या समोर असलेल्या ६० मिटर रस्त्याचा अर्धा भाग ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’साठी देण्याची विनंती आयुक्त दिलीप ढोले यांना परिवहन आयुक्तांनी केली. ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’साठी ही जागा तत्काळ मिळावी म्हणून परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मीरा-भाईंदर महापालिकेला पत्र दिले आहे. येत्या आठवडाभरात महापालिकेने या जागेचा ताबा आरटीओला दिल्यास आवश्यक पूर्व तयारी करून १ मे पासून मीरा-भाईंदरमध्येच ‘ड्रायविंग टेस्टिंग ट्रॅक’ व प्रत्यक्ष वाहनांचे पासिंग सुरु करू , असे परिवहन आयुक्तांनी सांगितले आहे.
मीरा भाईंदरच्या नागरिकांना होणार फायदा
मीरा-भाईंदर शहरात आरटिओचे उपकेंद्र असले तरी पुरेशा जागेअभावी टेस्टिंग ट्रॅक आतापर्यंत उपलब्ध नाही. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरातील गाड्यांच्या पासिंगसाठी सर्व सामान्य नागरिकांना ठाणे, ऐरोली व नांदिवली या मीरा-भाईंदरपासून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी जावे लागत होते. नागरिकांचा वेळ , पैसा जातोच, शिवाय लोकांना जाण्या-येण्याचा नाहक त्रास होतो. एक संपूर्ण दिवस त्यात निघून जातो. त्यामुळे मीरा-भाईंदर शहरामध्येच वाहनांच्या पासिंगची व्यवस्था सुरू झाल्यास नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार असल्याने आमदार प्रताप सरनाईक यांनी याबाबत पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. मीरा-भाईंदरमध्ये टेस्टिंग ट्रॅकबाबत निर्णय घेतल्याबद्दल परिवहन मंत्री अनिल परब यांचे आमदार सरनाईक यांनी आभार मानले आहेत. १ मे पासून मीरा-भाईंदर शहरात हा ट्रॅक व पासिंगची सुविधा प्रत्यक्षात सुरु होईल यासाठी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरु राहील , असे सरनाईक यांनी बैठकीनंतर बोलताना सांगितले.
सर्व गाड्यांच्या पासिंगसाठी व आरटीओच्या अन्य कामांसाठी एस.टी. महामंडळाची भाईंदर पश्चिम येथील जागा पार्किंग, पासिंग व कार्यालयीन कामकाजाकरीता देण्यासंदर्भात एस.टी. महामंडळ व मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तांची एक संयुक्त बैठक लवकरच लावण्यात येईल असे आश्वासनही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे. त्यामुळे भविष्यात मीरा भाईंदर शहरात मीरा भाईंदरचे स्वतःचे आरटीओची कायमस्वरूपी भव्य इमारत , त्याच परिसरात टेस्टिंग ट्रॅक व एकाच ठिकाणी मीरा-भाईंदरच्या नागरिकांची आरटीओची सर्व कामे होण्याच्या दृष्टीनेही आमचे प्रयत्न सुरु आहेत , असे सरनाईक म्हणाले.