सलग सुट्ट्यांचे स्वप्न विरले; आयुक्तांनी कामाला लावले!

सुट्टीच्या दिवशी अधिकाऱ्यांसोबत मॅरेथॉन बैठका

ठाणे : गुरुवारपासून चार दिवस असलेल्या सुट्ट्या पाहून अनेक योजना, सहलींचे नियोजन केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्व मनसुब्यांवर आयुक्तांनी पाणी फेरल्याचे दिसून आले. आज गुरुवारी सुट्टी असताना आयुक्तांनी पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी सलग साडेतीन तासांची मॅरेथॉन बैठक घेतली. यावेळी खड्डे, ई ऑफिस, उत्पन्न आदी कामांना गती देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्यामुळे सुट्ट्यांचे बेत रद्द करून अधिकाऱ्यांना कामाला जुंपून घ्यावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात खड्डे पडणार नाहीत याबाबत आत्तापासूनच उपाययोजना करण्याच्या सूचना ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत केल्या. महावीर जयंतीपासून चार दिवस सुट्ट्या असल्याने अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहलीच्या योजना केल्या होत्या, परंतु गुरुवारी सुट्टीच्या दिवशी आयुक्तांनी घेतलेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले आहे दुपारी १ वाजता सुरु झालेली आढावा बैठक संध्याकाळी ४.३० वाजता संपली. या बैठकीत आयुक्तांनी खड्ड्यांच्या समस्येसह पावसाळापूर्व कामांना गती देण्याबाबत निर्देश दिले. दोन वर्षांपूर्वी सहाशे कोटी रुपये खर्च करून ठाण्यातील बहुतेक रस्त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. पण तरीही शहरातील काही अंतर्गत रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडत असल्याचे निदर्शनास येते. अशा रस्त्यांची यादी तयार करून कोल्ड मिक्सने ते रस्ते आताच सुस्थितीत आणण्याच्या सुचना आयुक्तांनी या बैठकीत दिले. तसेच विविध प्राधिकरणाचे रस्तेही पालिका हद्दीतून जातात. विशेषता मानपाडा, घोडबंदर मार्गावर पावसाळयात एमएमआरडीए, एमएमआरडीसी, सार्वजनिक बांधकाम आदी प्राधिकरणाच्या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडतात. त्यामुळे पालिका टिकेची धनी होते. या रस्त्यांच्या दुरुस्तीची जबाबदारीही पालिकेने अंगावर घेत त्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले. बैठकीमध्ये ई ऑफीस, स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या स्थितीवरही त्यांनी यावेळी चर्चा केली.

दोन महिन्यानंतर पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात ठाणेकरांना खड्ड्याचा सामना करावा लागतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दरवर्षी खड्ड्याच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरावे लागते, त्यामुळे यावर्षी खड्डे पडणार नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. काय उपाययोजना करता येतात, कशाप्रकारे रस्ते सुस्थितीत राहतील, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त श्री.राव यांनी ई ऑफिसचे काय झाले, अशी विचारणा केली. ई ऑफिसचे कामकाज सुरु करून पेपरलेस कारभार सुरु करावा, अशी सूचना केली. त्याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षण मोहीम सुरु असून महापालिका करत असलेल्या उपाययोजनाचा आढावा देखील आयुक्त श्री. राव यांनी घेतला.

मागील वर्षी महापालिकेचे उत्पन्न ८३टक्के झाले होते, ते आणखी जास्त कसे होईल यावर उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी केल्या. इतर विभागाच्या कामकाजाबद्दल देखील त्यांनी आढावा घेऊन कामकाजात गतिमानता येण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना केली. या आढावा बैठकीला सर्वच विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.