आयुक्तांच्या इशाऱ्याला दिवा प्रभाग समितीने धुडकावले

सहायक आयुक्तांनी घातले
बेकायदा बांधकामांना पाठीशी

सुरेश सोंडकर/ठाणे

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांना तर ठाणे महापालिकेच्या आयुक्तांनी सहायक आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला असला तरी दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांनी या बांधकामांना पाठीशी घालत तो धुडकावल्याचे स्पष्ट झाले आहे.

साबे रोड येथे दिवा हायस्कूलच्या अलिकडे सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामाबाबत सहायक आयुक्तांना पायाचे बांधकाम सुरू असल्यापासून नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत संबंधित विकासकाला तीन मजल्यापर्यंत बांधकाम करण्याची मोकळीक देण्यात आली. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर दाखवण्यापुरती एक नोटीस बजावण्यात आली. आणि आयुक्तांच्या इशाऱ्यानंतरही प्रशासनाने वेळकाढूपणा करत विकासकाला बांधकाम पूर्ण करण्याची संधी दिली. अशा पद्धतीने दिवा प्रभागात शेकडो बांधकामे तोडक कारवाईपासून सुरक्षित राहिली.

दिवा प्रभागात सद्य स्थितीत शंभर ते सव्वाशेच्या आसपास लहान-मोठी अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. यात बहुमजली इमारतींचा सर्वाधिक समावेश आहे. फडके पाडा तलावापासून दिवा स्थानक, आणि स्थानकापासून साबे रोड, तर अलिकडे गणेश नगर पर्यंतचा पट्टा आणि उर्वरित दिवा पूर्व भागात जुन्या इमारतींवर नवीन बांधकामे, नवीन इमारती आणि चाळी अशी बांधकामांची जत्रा सुरू आहे.

नुकत्याच झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अनधिकृत बांधकामांबाबत आयुक्तांना जबाबदार ठरवण्यात येईल असे स्पष्ट बजावले आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असला तरी त्याचा वापर सिंचन आणि पिण्यासाठीच करण्यात यावा, बेकायदा बांधकामांसाठी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश आयुक्तांना दिले आहेत. त्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनीही बैठक घेत सहायक आयुक्तांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. केवळ स्लॅबला खड्डे न पडता पूर्ण बांधकाम तोडण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत, मात्र तरीही दिवा प्रभागात सहायक आयुक्तांनी एकाही अनधिकृत बांधकामावर पूर्णपणे तोडक कारवाई केली नसल्याचे दिसत आहे.

अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या दिवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, आणि अनधिकृत बांधकामांवर पूर्ण तोडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.