ठाणे : महाराष्ट्र शासनाचा महसुलाचा सर्वात मुख्य स्त्रोत असणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने या आर्थिक वर्षात ठाणे जिल्ह्यात १७५ कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. येत्या पंधरा दिवसात शासनाने दिलेले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न विभागाकडून केला जाणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाला २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. परिणामी, येत्या 15 दिवसांमध्ये विभागाकडून महसूल वाढविण्यासाठी कसोशीने आखणी केली जात आहे. गतवर्षी करोनाचा प्रादुर्भाव होता. तरीदेखील विपरीत परिस्थितीत विभागाने दिलेल्या उद्दिष्टपेक्षा अधिक महसूल जमा केला होता. त्याच्या तुलनेत मार्च महिना अखेरपर्यंत ३६० कोटी जमा करण्यासाठी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सातत्याने सतर्क आहेत, अशी माहिती विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे या प्रतिनिधीला दिली.
मद्याची दुकाने, बार अँड रेस्टॉरंट यांचा परवाना नूतनीकरण, बाहेरून राज्यात येणाऱ्या मद्यावरील शुल्क (आयात शुल्क), परवाना दुसऱ्या जागी स्थलांतर करणे (विशेष अधिकार शुल्क ) अशा विविध मार्गांनी विभागाकडे महसूल जमा होत असतो. १५ मार्चपर्यंत १७५ कोटी रुपयांचे संकलन झाले आहे, असे डॉ. सांगडे यांनी सांगितले.
येत्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सर्वाधिक महसुलाची वसुली होते, हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे एक्ससाईज विभागाला दिलेले उद्दिष्ट नक्कीच पूर्ण करू,असा विश्वास सांगडे यांनी व्यक्त केला. गतवर्षी २४५ कोटींचे उद्दिष्ट होते. परंतु आमच्या विभागाने २९५ कोटी सरकारी तिजोरीत जमा केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.