खासदार नरेश म्हस्के यांच्या ठाणे रेल्वे स्थानक अधिकाऱ्यांना सूचना
ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकाचा नुतनीकरणाच्या माध्यमातून कायापालट होत आहे. फलाटांवर नव्याने छतांची उभारणी, पंखे, वाढीव आरक्षण खिडक्या, वातानुकूलीत प्रतीक्षा कक्ष उभारण्यात येत आहे. नियमित स्वच्छतेवर भर द्या, युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दक्ष रहा, पावसाळ्यापूर्वी सर्व विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशा महत्वपूर्ण सूचना आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना केल्या.
ठाणे रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा तसेच प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला. या दौऱ्यानंतर बैठक घेण्यात आली. गेल्या वर्षभरापासून वेळोवेळी केलेल्या सूचनांची योग्य अमलबजावणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली आहे. आज प्रत्यक्षात सर्व बदल दिसत असून विकासकामांबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वे प्रवाशांच्या समस्या, विकासकामे, प्रस्तावित कामांबाबत मी निवडून आल्यापासून डीआरएम, डीएम यांच्याशी सातत्याने माझा पाठपुरावा सुरु आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठकाही झाल्या आहेत. आता नव्याने वातानुकूलीत प्रतिक्षा कक्ष उभारला जात असून येत्या जुलै महिन्यात त्याचे लोकर्पण अपेक्षित आहे. आठ एक्सिलेटर्स प्रवाशांच्या सेवेत असून दोन एक्सिलेटर्स लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी माध्यमांना दिली.
ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटांवरील नव्याने छताचे पत्रे बदलण्याचे काम वेगाने सुरु आहे. एका रेल्वे पादचारी पूलाचे काम सुरु असून लवकरच ते मार्गी लागणार आहे. उन्हाळ्याची सुट्टी पडली असून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जाणार असल्याने तातडीने दोन वाढीव आरक्षण खिडक्या सुरु करण्यात येणार आहेत. स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करणे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे पोलीस सज्ज असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली.
ठाणे आणि मुलंड रेल्वे स्थानकादरम्यान नवीन स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. कायदेशीर अडचण आल्याने त्याचे काम खोळंबले आहे. मात्र त्यातून तोडगा लवकरच निघणार असून नवीन रेल्वे स्थानकाची उभारणी झाल्यावर ठाणे रेल्वे स्थानकावरचा मोठा ताण कमी होणार आहे. ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी पाहाता मोजून दोन ते तीन तास विकासकामे करायला अधिकाऱ्यांना वेळ मिळतो. अतिशय कमी वेळेत रेल्वेचे अधिकारी काम करत असल्याबद्दल यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले.
पाहणी दौऱ्यात मध्य रेल्वेचे मंडल मुख्य अभियंता विलास पैठणकर, रेल्वे पोलीस दलाचे सहाय्यक आयुक्त अतुल क्षिरसागर, स्टेशन प्रबंधक केशव तावडे, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक एम. एल. मिना, शिवसेना ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, रमाकांत पाटील, विभागप्रमुख कमलेश चव्हाण, अमित जयस्वाल, किरण नाकती, निखिल बुडजडे, प्रशांत पाटील, संतोष बोडके, प्रकाश पायरे, संजिव कुलकर्णी, वैभव ठाकूर, आनंद जयस्वाल, रोहित गायकवाड, प्रीतम राजपूत, प्रकाश खांडेकर, विकास पाटील, सुशांत मोरे, अशोक कदम, रमाकांत चौधरी, मधुकर गिजे, महिला उपजिल्हाप्रमुख वंदना डोंगरे, विभागप्रमुख रिना मुदलीयार, यमुना म्हात्रे, प्राची मोरे आणि शिवसैनिक उपस्थित होते.