एमएमआरडीए क्षेत्राच्या विकासाबाबत सर्वांगीण चर्चेतून विकास व्हावा-मुख्यमंत्री

ठाणे : ‘अर्बन ट्रान्सफॉर्मेशन समिट- महाराष्ट्र’मध्ये एमएमआरडीए क्षेत्राच्या विकासासंबंधी प्राधिकरणाने सर्वांगीण होणारी चर्चा नव्या विचारांना आणि प्रयत्नांना चालना देणारी आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दलही त्यांनी कौतूक केले.
‘आजच्या या समिटच्या निमित्ताने प्राधिकरणाच्या क्षेत्राच्या विकासाबाबत सर्वांगीण चर्चा केली गेली. पायाभूत सुविधांचा आणि औद्योगिक विकासाद्वारे क्षेत्राचा शाश्वत आर्थिक विकास व्हावा हे उद्दीष्ट्य आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. असे करताना उद्योगांना चालना मिळण्यासाठी उद्योगांना पूरक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला चालना दिली, पाच ट्रिलिअन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवले. त्यासाठी महाराष्ट्रानेही एक ट्रिलिअन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवले आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राला नव्या विचारांची, नव्या कल्पनांची गरज आहे. यासाठी ही समिट उपयुक्त ठरेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, असेही उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की,”महाराष्ट्र सरकारने वाहतूक व्यवस्था सुधारावी यासाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. हेच काम प्राधिकरण करत आहे. नागपूर-मुंबई द्रुतगती महामार्ग, एमटीएचएल, कोस्टल रोड यांसारखे नावीन्यपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्प राबविण्यात आले. यामुळे महाराष्ट्र राज्य हे भारतामध्ये शहरी विकासाच्या बाबतीत अव्वल राज्य आहे.

या शिखर परिषदेत पाच चर्चासत्रांचे आयोजन केले होते. यावेळी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रमण्यम, ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. भूषण गगराणी, नगर विकास खात्याचे प्रधान सचिव-१ असीम कुमार गुप्ता, नामवंत आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर, नरिंदर नायर, अध्यक्ष मुंबई फर्स्ट, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
गेल्या काही वर्षात एमएमआर क्षेत्राच्या विकासासाठी प्राधिकरणाने केलेली विकासकामे ही आमच्या क्षमतेची आणि सिद्धतेची झलक दाखवणारी कामे आहेत. एमएमआर क्षेत्रात सुरू असलेले 337 किलोमीटर लांबीचे जगातील सर्वात मोठे मेट्रो जाळे तयार करण्याचे काम लोकांसमोर मांडताना आम्हाला अभिमान वाटतो. एमएमआर क्षेत्रातील पाच जिल्हे अधिक मोठ्या प्रमाणावर जोडले जावेत यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणण्यात आल्या, असे डॉ.संजय मुखर्जी म्हणाले.