भिवंडी : भिवंडीतील तीन विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूकीचे धक्कादायक निकाल समोर आले आहेत. एकूण ३२ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाली आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले यांनी ३१,२९३ मतांनी विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. या मतदारसंघात १०७२ मतदारांनी नोटा केले. त्यापेक्षा कमी मिळालेल्या १४ उमेदवारांपैकी नऊ उमेदवारांना आपले डिपॉझिट गमवावे लागले. त्यांना नोटा पेक्षा देखील कमी मते मिळाल्याने त्यांचा लाजिरवाणा पराभव झाला.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी संतोष शेट्टी यांना कडवी झुंज दिली आणि त्यांचा ५१,७८४ मतांनी पराभव करत दुसऱ्यांदा विजय मिळवला. या मतदारसंघात एकूण ११ उमेदवारांपैकी आठ उमेदवारांना नोटापेक्षा देखील कमी मते मिळाल्याने ते त्यांची अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत.
भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा ५७,९६२ मतांनी पराभव करत तिसऱ्यांदा विजय मिळवला. येथे २५७१ मतदारांनी नोटा केले. या मतदारसंघात एकूण सात उमेदवारांपैकी तीन उमेदवार असे होते त्यांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याने ते डिपॉझिट वाचवू शकले नाहीत.
भिवंडीतील तीन मतदारसंघांत नोटामुळे पराभूत झालेल्या २१ उमेदवारांमध्ये काही नामवंत पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या पराभवामुळे पुढील मनपा निवडणुकीच्या राजकारणात परिणाम होणार आहे. मतदार आता केवळ औपचारिक उमेदवारांना स्वीकारण्यास तयार नसल्याचे या निकालावरून दिसून येते. हे निकाल राजकीय पक्षांना इशारा देणारे ठरतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता केवळ निवडणूक समीकरणच नव्हे, तर उमेदवारांची प्रतिमा आणि सार्वजनिक समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याला महत्त्व प्राप्त होणार आहे.