लोकसभा निवडणुकीनंतरच १४ गावांचा निर्णय ?

नवी मुंबई : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील १४ गावांना नवी मुंबई महानगर पालिकेत समाविष्ट करण्याची अंतरिम अधिसूचना मागील दीड वर्षांपासून काढली गेली नाही. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांची संभाव्य उमेदवारी पाहता या १४ गावांचा अंतिम निर्णय लोकसभा निवडणुकीनंतरच घेतला जाईल, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

कल्याण तालुक्यातील १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याचा निर्णय २०२२ मध्ये शासनाने घेतला आहे. यावर सप्टेंबर २०२२मध्ये हरकती-सूचनांसाठी नोटीस जाहीर केली होती. यावर एकही हरकत न आल्याने नवी मुंबईत १४ गावे समाविष्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यास दीड वर्ष उलटला तरी शासनाने अंतिम अधिसुचना काढलेली नाही.

याबाबत आमदार राजू पाटील तसेच १४ गाव विकास समितीमार्फत पावसाळी अधिवेशन दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदने देण्यात आली होती. यावेळी ही गावे लवकरच नवी मुंबईत समाविष्ट केली जातील असे आश्वासन दिले होते. आता लवकरच लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. आणि येथील मतदारांची नोंद कल्याण लोकसभा मतदारसंघात आहेत. या मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. संपूर्ण १४ गावांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेची पकड आहे. त्यामुळे हक्काचे मतदार पाहता ही गावे लोकसभा निवडणुकीनंतरच नवी मुंबईत समाविष्ट केली जातील, असे
मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

शासनाने एखादा निर्णय घेऊन जर नागरीकांच्या हरकती-सूचना मागवल्या असतील आणि एकही हरकत आली नसेल तर तो निर्णय जसाच्या तसा लागू होतो. मात्र आज पंधरा महिने होत आले तरी या १४ गावांचा अंतिम निर्णय शासनाने घेतला नसल्याने यात मतांच्या बेरजेचे गणित नाकारता येत नाही, असे मत राजकीय विश्लेषक विश्र्वरथ नायर यांनी व्यक्त केले.