मलनिःसारण केंद्रातून निघणाऱ्या पाण्याद्वारे उद्यान होणार विकसित
भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेकडुन मिरा रोड येथील पूनम सागर परिसरात भारतीय प्रजातीच्या मसाल्याची लागवड करून थेट ‘मसाला’ उद्यानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मसाल्यांच्या झाडाविषयी ओळख होण्यास मदत होणार आहे.
मिरा भाईंदर शहर हे ‘उद्यानाचे शहर’ म्हणून ओळखले जावे याकरिता पालिकेकडून पावले उचलण्यात येत आहेत. याकरिता नुकत्याच सादर केलेल्या प्रशासकीय अर्थसंकल्पात देखील तशी तरतूद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत शहरात एकूण ७२ उद्याने विकसित करण्यात आली असून प्रत्येक उद्यानाला एक विशिष्ट महत्व प्रदान केले जात आहे. त्यानुसार मिरा रोड येथील अय्यपा मंदिर जवळ ‘मसाला उद्यान’ तयार केले जात आहे. विशेष म्हणजे हे उद्यान पूर्णतः मलनिःसारण केंद्रातून निघणाऱ्या पाण्याद्वारे विकसिक केले जाणार आहे.
यात प्रामुख्याने भारतीय प्रजातीत आढळणाऱ्या आले, मेथी, कोथिंबीर, हळद, दालचिनी आणि लवंग अशा मसाल्याच्या प्रत्येकी दोन ते तीन वेली लावण्यात येणार आहेत. याद्वारे निर्माण होणाऱ्या मसाल्याचा वापर आवश्यक कामाकरिता करण्यात येणार आहे. शिवाय या उद्यानाला योग्य प्रकारे विकसित करून पालिका शाळेत तसेच खाजगी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षण सहल काढून त्यांना मूळ मसाल्याच्या लागवडी संदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
कोरोना काळात भारतीय मसाल्यांनी विशेष कामगिरी पार पाडली आहे. त्यामुळे लहान मुलांना देखील या मसाल्यांची मुळ ओळख व्हावी याकरिता पालिकेकडून मिरा रोड येथे मसाला उद्यानाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे उपआयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले.