ढासळलेल्या मलवाहिनीची दुरुस्ती झाली तब्बल सहा महिन्यांनी!

‘ठाणेवैभव’ इम्पॅक्ट

ठाणे : येथील उथळसर प्रभाग समितीसमोरील ‘मलवाहिनीच्या ढासळलेल्या चेंबरच्या दुरुस्तीसाठी महापालिकेला वेळ मिळेना’ हे वृत्त  ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध होताच, महापालिकेच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी त्याची दखल घेत या मलवाहिनीची दुरुस्ती केली व त्यात साचलेली प्रचंड घाण उपसून ते चेंबर स्वच्छ केले. या परिसरातील रहिवाशांनी ‘ठाणेवैभव’चे आभार मानले आहेत.

मुख्य रस्त्यावरील मलवाहिनीचे चेंबर गेल्या ८ ऑगस्टपासून ढासळलेले होते. त्याची लेखी तक्रार ठाणे पालिकेच्या मलनि:स्सारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे नोंदवली असताना त्याची दखल पालिकेने घेतली नसल्यामुळे स्थानिक रहिवासी कातावले होते. यासंबंधीची लेखी तक्रार २० जून २२ रोजी पुन्हा करुनदेखील संबंधित अभियंते काहीच हालचाल करत नव्हते.
त्यांनी स्टेडियम पेटीवर  ब-याच वेळा तक्रार केली. परंतु, चेंबर ढासळल्याने घाणेरडे पाणी सतत वाहातच होते. ही बाब स्थानिकांच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्यामुळे पालिकेने त्वरीत निराकरण करणे आवश्यक आहे, अशी लेखी तक्रार रहिवाशांनी संबंधितांना अणि पालिकेच्या मुख्यालयातील मलनि:स्सारण विभागाचे वरिष्ठ अभियंते  सजनानी यांच्याकडे केली होती. तरीही काहीच कार्यवाही न झाल्याने स्थानिक रहिवासी आणि हिंदी भवन’चे विश्वस्त हरीष तिवारी यांनी ‘ठाणे वैभव’कडे धाव घेतली.

२४ जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची त्वरित दखल घेऊन महापालिकेच्या मलनि:स्सारण खात्याचे कनिष्ठ अभियंते सुनिल सजनानी यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन चेंबर बांधून देण्यात आले आहे.