अंतर्गत मेट्रोचा खर्च अडीच कोटींनी वाढला

प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर

ठाणे : विविध बदल, पर्यायाने होत असलेला विलंब यामुळे ठाण्यातील अंतर्गत मेट्रोचा खर्च वाढला असून महापालिकेला अडीच कोटींहून जास्त वाढीव खर्चाची तजवीज करावी लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठाण्यातून मुख्य मेट्रो लाईन ही हायवेवरून जाणार असल्याने या मुख्य मेट्रोपर्यंत प्रवाशांना जाता यावे यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने अंतर्गत मेट्रोचे प्लॅनिंग करण्यात आले आहे. अंतर्गत मेट्रोच्या कामासाठी शहरातील अस्तित्वात असलेल्या डीपी रस्त्यांचे अधिग्रहण केले जाणार असून त्यामुळे मेट्रोच्या २९ किमींच्या मार्गांपैकी १८ किमीच्या डीपी रस्त्यांचा विकास होणार आहे. ४ किमीच्या आरक्षित जागेचा वापर केला जाणार असून एचसीएमटीआर या वाहतुकी व्यवस्थेसाठी सहा किमीच्या रस्त्यांचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. अंतर्गत मेट्रोचा विकास पाच टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून यासाठी सुमारे १०,८९३ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कळवा-मुंब्रा या मार्गाचा विचार केला जाणार आहे. २०२५ ला जेव्हा ठाण्यात अंतर्गत मेट्रो धावेल तेव्हा दररोज पाच लाखांची प्रवाशी संख्या या मार्गावर अपेक्षित धरण्यात आली आहे. दोन किमीच्या अंतरासाठी कमीत कमी १७ रूपये भाडे आकारले जाणार असून त्यानंतर जास्तीतजास्त १०४ रुपयांपर्यंत भाडे आकारले जाणार आहे.

मेट्रोच्या कामासाठी पालिकेने महामेट्रोची नियुक्ती केली होती. त्यानुसार महामेट्रोने सविस्तर प्रकल्प अहवाल बनविल्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाकडून या प्रस्तावामंध्ये वांरवार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे महामेट्रोची अतिरिक्त कामे वाढली आहेत. त्यानुसार या कामासाठी अतिरिक्त कामापोटी त्यांनी मनुष्यबळ आधारावर एक कोटी ७४ लाख तसेच वाढीव पाच किमी लांबीसाठी करारनाम्याप्रमाणे १० लाख प्रति किमी याप्रमाणे ५० लाख अधिक जीएसटी असे मिळून २ कोटी ६४ लाख ३२ हजार रुपये इतक्या रकमेचे देयक मिळण्यासाठी महामेट्रोने पालिकेला मागितले आहे.

अंतर्गत मेट्रोचे स्टेशन

रायलादेवी, वागळे इस्टेट सर्कल, लोकमान्य नगर डेपो, शिवाई नगर, डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा-डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ, पातलीपाडा, आजाद नगर, मनोरमा नगर, कोलशेत औद्योगिक परिसर, बाळकूम नाका, बाळकूम पाडा, राबोडी-शिवाजी चौक, ठाणे रेल्वे स्टेशन (भूमिगत )