नालेसफाईचा खर्च दहा वर्षांत तिप्पट

समस्या मात्र जैसे थे

ठाणे: ठाणे महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात नाल्यांचे काँक्रीटीकरण झालेले असताना नाले सफाईचा खर्च कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षांत नालेसफाईचा खर्च साडेतीन कोटीवरून १२ कोटींवर आला आहे. असे असले तरी नाल्यांची समस्या मात्र कायम असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नालेसफाईची कामे एप्रिल महिन्यातच सुरू व्हायला हवीत, परंतु बर्‍याचदा ही कामे वेळेत दिली जात नाहीत. यंदा मात्र प्रशासकीय राजवट सुरु असताना मागील महिन्यात निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या असून १७ एप्रिल रोजी निविदा उघडण्यात येऊन नालेसफाईच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. महापालिका हद्दीतील ११२ किलोमीटर लांबीचे ४४ नाले असून २०१० साली नालेसफाईच्या कामांवर फक्त एक कोटी ३० लाख रूपये खर्च केले होते, मात्र या खर्चात दरवर्षी मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बारा वर्षात हा खर्च जवळपास दहापटीहून अधिक वाढला आहे शहरातील जवळपास ९० टक्के नाल्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात आले असताना खर्च कमी होण्याऐवजी वाढत चालला असल्याने या खर्चाभोवतीचा संशय वाढत चालला आहे.

काम वाटप करताना हितसबंध जपणार्‍या कंत्राटदारालाच कामाचे वाटप होत असल्याचे आरोपही वेळोवेळी झाले आहेत. दरवर्षी पावसाळापूर्व कामासाठी कोट्यवधी रूपये खर्च करण्यात येत असले तरी नाल्यांची सफाई कधीच पूर्ण होत नाही. वरवरची सफाई केली जाते आणि नालेसफाई झाली असल्याचे दाखवून देयके मंजूर केली जातात. विशेष म्हणजे नालेसफाई किती झाली हे मोजण्याचे काही साधन उपलब्ध नसल्यामुळे त्याचा फायदा आधिकारी आणि ठेकेदार घेताना दिसत आहेत. अशा प्रकारे संगनमताने पालिकेच्या तिजोरीची लूट सुरू आहे. ठाणे महापालिकेत तर काही अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हेच ठेकेदार असल्याचे आरोप गेले अनेक वर्षे होत आहेत.

नालेसफाईचा वाढता खर्च
वर्ष खर्च
२०१२-१३ ३,४१,७९,६८५
२०१३-१४ ४,३९,९१,०००
२०१४-१५ ४,५२,०००००
२०१५-१६ ५ ,९२ ,५६०००
२०१६-१७ ६,५२,३३०००
२०१७-१८ ७,०८,३५०००
२०१८-१९ ११,४४०००००
२०२० -२१ ६,३७,०००००
२०२१-२२ १४,८५,०००००
२०२२-२३ १२,००,०००००
२०२३-२४ १०,००,०००००

(प्रस्तावित )