महाराष्ट्रातील पहिली ई बस धावली ठाणे ते पुणे

दोन दिवसांत 166 प्रवासी,
७६ हजाराचे उत्पन्न

ठाणे : महाराष्ट्रातील पहिल्या ईलेक्ट्रिक बससेवेचा प्रारंभ ठाणे ते पुणे या मार्गावर झाला आहे. या प्रवासाचे पहिले प्रवासी आदित्य गायकवाड यांना बसचे पूजन करण्याचा मान मिळाला.

‘ओलेक्ट्रा सी 9’ या बनावटीची ही प्रवासी बस वीजेवर धावणारी असल्यामुळे प्रवाशांना नेहमीच्या डिझेल बसगाड्यांच्या इंजिनचा आवाज येणार नसल्यामुळे त्यांचा प्रवास शांततेत होणार आहे.
1 मे 23 रोजी पहिली ई बसगाडी ठाणे ते स्वारगेटपर्यत गेली होती. त्यातून 20 हजार 550 रुपये प्रती किलोमीटर उत्पन्न मिळाले. पहिल्या फेरीत प्रवासी भारमान 95.37 इतके होते.

2 मे 23 रोजी पहिल्या दिवसापेक्षाही ई बसचा प्रवास 465. 9 किलोमीटर झाला असून, 55 हजार 415 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. भारमान 85. 72 इतके होते आणि 121 प्रवाशांनी प्रवास केला आहे. याप्रसंगी विभाग नियंत्रक विलास राठोड, यंत्र अभियंता प्रतिभा भागरे, उप अभियंता बच्छाव, विभागीय वाहतूक अधिकारी रमेश बांदल, आगार एकचे व्यवस्थापक अहिरे आणि आगार दोनचे व्यवस्थापक प्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

या बसगाडीच्या 360 किलो वॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटर्स एका प्रगत लिथियम-आयन-फॉस्फेट बॅटरीशी जोडलेल्या आहेत. त्या एका चार्जवर सुमारे 300 किमीची रेंज देऊ शकतात आणि जलद-चार्जिंग प्रणाली वापरून 2-3 तासांत रिचार्ज करण्याचीही क्षमता आहे.

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि त्यांच्या तंत्रज्ञान भागीदाराद्वारे ऑलेक्ट्रा बसेस भारतीय बनावटीच्या आहेत. त्याच्या पुढील बाजूस, एक मोठी काचेची विंडशील्ड, समोरच्या फॅसिआवर पियानो ब्लॅक अ‍ॅक्सेंट, प्रोजेक्टर हेडलाइट्स, मार्कर लाइट्स आदी असल्यामुळे ही बस दिमाखदार दिसते, असे एस.टीच्या एका अधिका-याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले.