नगरसेवक भाजपात जाणार नाहीत

राष्ट्रवादीच्या कळव्यातील पदाधिकाऱ्याचा दावा

ठाणे: कळवा येथिल राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांचे शरद पवार यांच्याशी पिता-पुत्राचे नाते आहे, त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा प्रश्न निर्माण होतच नाही असे लेखी निवेदन या भागातील नगरसेवकांनी दिले आहे.

‘ठाणेवैभव’मध्ये आज शरद पवार यांच्या पक्षाला सोडचिट्टी देऊन माजी नगरसेवकांचा एक गट भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या बातमीमुळे कळवा येथिल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. या भागातील राष्ट्रवादीचे नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी माजी नगरसेवकांबरोबर संवाद साधून त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी कोणीही शरद पवार यांना सोडून जाणार नाही असे आश्वासन त्यांना दिल्याचे समजते. या भागात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून स्वत: श्री.आव्हाड हे संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणार आहेत. कळवा-मुंब्रा या मतदारसंघातील मतदारांचा राष्ट्रवादीवर विश्वास असून आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा कळवा-मुंब्रा या दोन प्रभाग समितीवर वर्चस्व मिळवेल, असा विश्वास एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.

श्री. आव्हाड हे मतदारसंघात नगरसेवकाप्रमाणे काम करतात, त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे. प्रत्येक प्रश्नवार ते राज्य सरकारकडे बाजू मांडत असल्याने या भागातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पक्ष सोडणार नाहीत, असे राष्ट्रवादीच्या एका माजी नगरसेवकाने सांगितले.