आय प्रभागाची मोठी कारवाई
कल्याण : कल्याण पूर्व द्वारली भागात आय प्रभागाच्या तोडकाम पथकाने सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या नेतृत्वाखाली बेकायदा चाळी उभारणीसाठी बांधलेली ४२ जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केली आहे. मागील काही महिन्यांतील आय प्रभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
कल्याण पूर्व द्वारली भागात झाडे, झुडपे तोडून बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी ४२ जोती बांधली असल्याच्या तक्रारी आय प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्याकडे आल्या होत्या. साहाय्यक आयुक्त पवार यांनी त्या बांधकामांची खात्री केली. त्यानंतर तोडकाम पथक घेऊन द्वारली येथील ४२ जोत्यांची बांधकामे जेसीबाच्या साहाय्याने उद्ध्वस्त केली.
या जोत्यांच्या बाजुला बेकायदा चाळी उभारणीसाठी भूमाफियांनी वीटा आणून ठेवल्या होत्या. या विटांची नासधूस पथकाकडून करण्यात आली. ही कारवाई सुरू असताना एकही भूमाफिया कारवाईला विरोध करण्यासाठी पुढे आला नाही. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहता कामा नये, असे आदेश आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांंनी सर्व साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. प्रत्येक प्रभाग सहाय्यक आयुक्त आपल्या प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची काळजी घेत असल्याचे समजते.
उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारली येथील जोत्यांची बांधकामे सहाय्यक आयुक्त पवार यांनी जमीनदोस्त केली. या कारवाईत माफियांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. आय प्रभाग हद्दीतील सर्व नव्याने उभी राहत असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे भुईसपाट केली जात आहेत. प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे, असे सहाय्यक आयुक्त पवार यांनी सांगितले.