ठामपाचा कॉम्पॅक्टर खरेदीचा प्रस्ताव
ठाणे: शहरातील विविध भागांतील कचरा घंटा गाड्यांमार्फत सीपी तलाव परिसरात टाकला जातो. यासाठी सुमारे ३०० फेऱ्या होत आहेत. यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे. आता ठाणे महापालिकेच्या वतीने ७० कॉम्पॅक्टर घेण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे घंटागाड्यांचे ३०० फेऱ्यांचे काम कॉम्पॅक्टर अवघ्या ७० फेऱ्यांमध्ये उरकणार आहे.
एकीकडे शहरातील कचरा टाकण्यासाठी हक्काची जागा मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनामध्ये मोठे बदल करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. यासंदर्भात सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील कचरा संकलनासाठी ७० कॉम्पॅक्टर घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडून तयार करण्यात आला आहे. लवकरच हा प्रस्ताव मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.
सध्या शहरातील कचरा संकलनासाठी छोट्या छोट्या घंटा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या घंटागाड्या शहराच्या विविध भागात जाऊन कचरा संकलनाचे काम करत असतात. ज्या ठिकाणी मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत त्या ठिकाणी या घंटा गाड्याच्या माध्यमातून कचरा संकलित केला जातो. मात्र घंटा गाड्यांच्या माध्यमातून सीपी तलाव परिसरात कचरा टाकण्यासाठी ३०० पेक्षा अधिक फेऱ्या होत असल्याने या फेऱ्या कमी करण्यासाठी हे कॉम्पॅक्टर खरेदी केले जाणार आहेत.
घंटा गाड्यांच्या माध्यमातून कचरा संकलनाचे काम झाल्यानंतर या घंटा गाड्या कॉम्पॅक्टरला जोडल्या जाणार आहेत. एकाच वेळी १० घंटा गाड्या कॉम्पॅक्टरमध्ये खाली करण्याची सुविधा आहे. हा १० घंटा गाड्यांचा कचरा कॉम्पॅक्टरमध्ये टाकल्यानंतर कॉम्पॅक्टरच्या माध्यमातून सीपी तलाव या ठिकाणी कचरा टाकला जाणार असून यामुळे घंटा गाडयांच्या फेऱ्या, वेळ आणि पैशांची बचत देखील होणार आहे.