आयुक्त शर्मा यांची कोपरीत पाहणी
ठाणे : पूर्वद्रुतगती महामार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या सुरु असलेल्या विविध कामांमुळे आणि कोरोनाच्या दोन लाटांमुळे झालेल्या कोपरी भागातील सर्व्हिस रोडवर साचलेला विविध प्रकारचा कचरा उचलण्याचा ‘मुहूर्त’ विलंबाने हा होईना, अखेर ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रभागातील संबंधित विभागाला मिळाला.
सुमारे साडेचार -पाच तासांत एक ट्रक भरून कचरा हटवण्यात आला. महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा या मोहिमेची पाहणी करण्यासाठी येणार असल्यामुळे सफाई विभागाचे स्थानिक अधिकारी आणि अन्य कर्मचारी, कामगार यांची ‘टीम’ सकाळी ७ वाजल्यापासून सर्व्हिस रोडवर तैनात झाली होती. अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या मेहनतीमुळे रस्ता व आजूबाजूचा परिसर आज तरी स्वच्छ झाला.
ही सफाई पाहण्यासाठी आयुक्त १० वाजता येणार असल्याचे सांगितल्याने कचरापेटी अधिकारी, पर्यवेक्षक, सह- अधिकारी आणि कर्मचारी व कामगारांचा ताफा सीएनजी पंपापासून ते रेल्वे मार्गाजवळील आनंदनगरच्या वळणापर्यंत स्वच्छता करण्यासाठी झटत होता. रस्त्यावर पडलेले कागदाचे कपटे, रस्त्याच्या कडेला आणि बसगाड्यांच्या मागे असलेल्या प्लास्टिकच्या पिण्याच्या व मद्याच्या फुटक्या बाटल्या आणि मोठे दगड -वीटांसह विविध कचरा, वृक्षांच्या तुटलेल्या लहान-मोठ्या फांद्या, प्लास्टिकच्या पिशव्या आदी कच-याचा मोठा ढिग साचला होता. तो हटवण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
या रस्त्यावर लोकांची वर्दळ कमी, वाहनांची जास्त असते. येथे दिवस-रात्र लहानमोठ्या वाहनांची आणि काळोख झाल्यानंतर ‘फॉर हायर’ बसगाड्यांची, छोट्या कारची, टेंपोंची स्वघोषित ‘पार्किंग’ जागा आहे. त्याचा फायदा घेऊन बरेच ‘तळीराम’ तासन्तास ‘बसलेले’ असतात व बसगाड्यांचे चालकही येथे रेंगाळतात. त्यांना हटकण्याची तसदी स्थानिक पोलिस क्वचितच घेत असल्याने रहिवाशांना असुरक्षितता वाटते.
याच सेवा रस्त्याला खेटून विविध शोभिवंत फुले, वासांची फुलझाडे, समाजोपयोगी वृक्ष आदींचे वाफे तयार करुन त्याचे रोपण केले होते. मात्र कोविडच्या लाटांमुळे त्यांची नियमित निगा करण्यात आली नव्हती. परिणामी यांचा नाश झाला होता. त्याच्या तुटलेल्या, उन्मळुन पडलेल्या लहान-मोठ्या फांद्यांचा प्रचंड कचरा महामार्गालगत असलेल्या जमिनीवर पसरला आहे. तोही संपूर्ण कचरा हटवण्याचे काम सुरु झाले आहे. आज सोमवारी पहिल्या दिवशी मोठ्या ट्रकच्या १० पेक्षा अधिक फे-या करण्यात आल्या, अशी माहिती ‘ग्रीन गार्डन’संस्थेचे महादेव पाटील यांनी ‘ठाणेवैभव’ला दिली.