आचारसंहिता संपली वसुली सुरू झाली!

ठामपाची थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या कामात महापालिका कर्मचारी गुंतल्यामुळे मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला होता. आचारसंहिता संपताच कर्मचारी पुन्हा एकदा कामाला लागले असून दहा लाखापेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या सुमारे पावणे दोनशे थकबाकीदारांना नोटीस पाठवून कारवाई सुरू करण्यात आली असून मालमत्ता कर विभागाने ५०० कोटी वसुलीचा टप्पा देखील पार केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात ६ लाख १५ हजार मालमत्ता ग्राहक असून या सर्वांना मालमत्ताकराची देयके पाठवण्यात आली. त्यापैकी दहा लाखापेक्षा जास्त कर असलेल्या १७९ मालमत्ता ग्राहकांना थकबाकीच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. या ग्राहकांनी वेळेवर करभरणा करावा, यासाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस देखील पाठवण्यात आले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी वेळेवर करभरणा केला नाही तर त्यांना दंड आकारून त्यांच्या घरातील मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘ठाणेवैभव’ला सांगितले. करभरणा करणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन कर भरता येणार आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेचे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहे.

मालमत्ता कर विभागाला ८५७ कोटी इतक्या वसुलीचे टार्गेट देण्यात आले असून ५ डिसेंबर पर्यंत ५०४ कोटी इतका कर वसुल करण्यात आला आहे. मागील वर्षी ५ डिसेंबर पर्यंत ४५१ कोटी इतकी वसुली झाली होती. ही वसुली मागील वर्षापेक्षा ५० कोटीने जास्त आहे. तर मालमत्ता कर विभागाला पुढील चार महिन्यात ३५० कोटी मालमत्ता करवसुली करण्याचे आव्हान आहे. त्यादृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त जी. जी. गोदापुरे यांच्या विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांनी वसुलीची मोहीम सुरु केली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त वसुली करण्याचा निश्चय या विभागाने केला आहे.

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी दरवर्षी अभय योजना राबवून दंड माफ केला जातो. परंतु यावर्षी अभय योजना राबवण्यात येणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांना दंड आणि व्याजासहित मालमत्ता कर भरावा लागणार आहे.