ठाणे : इतर महापालिकांच्या तुलनेत घनकचऱ्यावरच ठाणे महापालिकेचा सर्वात कमी खर्च होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच आवश्यक निधी नसल्याने नवीन वर्षातही भंडार्ली प्रकल्प सुरु होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे दिवा डम्पिंग बंद होण्यासाठी दिवेकरांना आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भंडार्ली येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. साधारणपणे तीन महिन्यापूर्वी येथे ६०० मेट्रीक टन कचऱ्यावर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचा दावा पालिकेच्या घनकचरा विभागाने केला होता. उर्वरीत ३०० मेट्रीक टन कचरा हा दिवा डम्पींगवरच टाकला जात होता, असेही पालिकेने स्पष्ट केले होते. परंतु मधल्या काळात झालेल्या धुवाधार पावसामुळे त्याचा परिणाम येथील प्रकल्पावर झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यामुळे सप्टेंबरपासून येथे कचरा टाकणे किंबहुना हा प्रकल्प बंद करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली होती.
भंडार्लीचा प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. भाडंर्ली प्रकल्पाच्या ठिकाणी प्रत्येक टनामागे जो कमीतकमी खर्च अपेक्षित आहे तो खर्च करण्यासाठी देखील पालिकेने आखडता हात घेतला असल्याने निविदा काढूनही या निविदेला किती प्रतिसाद मिळेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.