दिवा-वसई रेल्वे मार्गावरील धक्कादायक प्रकार
ठाणे : बऱ्याचदा निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. परंतु दिवा-वसई रेल्वेमार्गावर कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दिवा-वसई रेल्वे मार्गावर डोंबिवली पूर्वेकडून डोंबिवली पश्चिमेकडे मोठागाव इथे जाण्यासाठी रेल्वे फाटक आहे. काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास हे फाटक उघडेच होते. एका जागरुक नागरिकाने या ठिकाणी ट्रेन येताना पाहिली तेव्हा त्याने फाटकाशेजारी असलेल्या केबिनमध्ये धाव घेतली. यावेळी फाटक उघडण्यासाठी असलेला कर्मचारी झोपलेला असल्याचे दिसून आले. रात्रीची वेळ असल्याने सुदैवाने या ठिकाणी कोणताही अपघात झाला नाही.
या नागरिकाने या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ बनवला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी या व्हिडीओची दखल घेतली. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्याच्या निष्काळजपणाबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी ट्वीट माध्यमातून रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
दरम्यान दोन ते अडीच महिन्यांपूर्वी मुंबईच्या मेट्रो वनच्या चकाला स्थानकावर अपघात झाला होता. मेट्रो ट्रेनमध्ये चढताना एका तरुणीचा ड्रेस ट्रेनच्या दरवाज्यात अडकला. त्यानंतर मेट्रो ट्रेन सुरु झाल्यावर तरुणी प्लॅटफॉर्मवर फरफटत गेली. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 21 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. अपघातानंतर तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.