वसईत एकाच घरात तीन फेरीवाल्यांचे मृतदेह !

भाईंदर : वसईतील नौपाडा परिसरातील आशा चाळीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील घरात तीन पुरुषांचे मृतदेह माणिकपूर पोलिसांना आढळून आले आहेत. मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. मयत व्यक्तींच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

वसईच्या पश्चिमेकडील माणिकपूर चौक-नौपाडा येथे आशा सदन नावाची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरातून दुर्गंधी येत होती. त्यामुळे तेथील नागरिकांनी ही माहिती पोलिसांना कळवली होती. सायंकाळी पाच वाजता माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी दुसऱ्या मजल्यावर एक घर बंद असल्याचे आणि त्यातून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना दिसून आले. घराचा दरवाजा व खिडक्या बंद असल्याने घराच्या काचेच्या खिडक्या तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला असता, तीन तरुणांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले. मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांनी ते विच्छेदनासाठी पाठवले आहेत. त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे.

दरम्यान गॅस गळतीतून या तिघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, मयत झालेल्यांमध्ये मोहम्मद आझम, राजु आणि छुटाकाऊ (बाबू) यांचा समावेश आहे. हे तिघेही वसईतील आनंद नगर परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करीत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.