ठाण्यात सहा महिन्यांत डेंग्यूचे ४८ रुग्ण
ठाणे: ठाणे शहरात जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ७८ डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळले असून यातील ४८ जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणाचाही मृत्यू झाला नसला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या यावर्षी जवळपास चौपट वाढली असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा सुरु झाला की साथ रोगांचे रुग्ण वाढत असतात. यामध्ये डेंग्यू, मलेरिया आणि इतर आजारांच्या रुग्णांचा समावेश असून खासकरून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी पालिका प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेच्या रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या रेकॉर्डनुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये सर्वाधिक डेंग्यूचे १६ संशयित रुग्ण आढळले असून यामध्ये आठ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मार्चमध्ये १४ आणि जूनमध्ये १२ संशयित रुग्ण आढळले असून यातील मार्चमध्ये ११ तर जूनमध्ये सहा जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची आकडेवारी कमी आहे. सहा महिन्यांत १९ संशयित रुग्ण आढळले असून त्यात नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे उघड झाले आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही २६ असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जानेवारी ते जून २०२३ मध्ये यंदापेक्षा डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ही कमी होती. गेल्या वर्षी संशयित रुग्णांची संख्या २९ होती. तर लागण झालेल्या रुग्णांची संख्या १३ होती. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयात १९ संशयित रुग्ण आढळले होते. यामध्ये नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली होती. दुसरीकडे खाजगी रुग्णालयांमध्ये १० संशयित रुग्ण आढळले होते. यामध्ये चार जणांना डेंग्यूची लागण झाली होती.
डेंग्यूचा आजार कसा होतो?
डेंग्यूचा विषाणू डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो. डासांच्या या प्रजाती चिकनगुनिया, येलो फीव्हर आणि झिका विषाणूही पसरवतात. डेंग्यू उष्णकटिबंधीय हवामान असलेल्या सर्व ठिकाणी पसरतो. पाऊस, तापमान, आर्द्रता आणि शहरांची अनिर्बंध वाढ या कारणांनी त्या त्या ठिकाणी डेंग्यूचा उद्भव आणि प्रसार होतो.
डेंग्यूची लक्षणे
तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, स्नायू आणि सांधेदुखी, मळमळ, उलट्या, ग्रंथींना सूज, रॅशेस यांपैकी कोणतीही लक्षणं असतील, तर डेंग्यू झालेला असू शकतो.
काय काळजी घ्यावी?
आपल्या घराच्या जवळ किंवा इमारतीत, चाळीत, वस्तीत पाणी साचून राहणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. कुठे डबकी तयार झाली असतील, तर ती बुजवावीत. तसेच, कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. घरातल्या टाक्या, कळशा किंवा पाणी साठवण्याची भांडी झाकलेली असतील, याची काळजी घ्या. तसेच, त्यातले पाणी ठराविक दिवसांनी बदलावे. डास घरात येऊ नयेत म्हणून आवश्यक ती काळजी घ्यावी. खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात. आवश्यकतेनुसार कीटकनाशके, कॉइल्स आदींचा वापर करावा. शाळा, तसेच कामाच्या ठिकाणीही ही काळजी घ्यावी. घराभोवती आणि घरातही स्वच्छता राखावी.
शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी (जून २०२४ पर्यंत )
संशयित रुग्णांची संख्या – ७८
लागण झालेल्या रुग्णांची संख्या – ४८
बरे झालेले रुग्ण – १२६
शहरातील डेंग्यूच्या रुग्णांची आकडेवारी (जून २०२३ पर्यंत )
संशयित रुग्णांची संख्या – २९
लागण झालेल्या रुग्णांची संख्या – १३
बरे झालेले रुग्ण – ४०