रणरणत्या उन्हात पक्ष्यांना मिळाले पाणी आणि दाणे

एका ‘आनंद’प्रेमीचा येऊरमध्ये भूतदयेचा अखंड यज्ञ

ठाणे: सध्या रणरणत्या उन्हात उष्णतेचा पारा चाळिशी पार गेला असून येऊरसारख्या परिसरात पक्षी आणि प्राणी अन्न आणि पाण्यासाठी भटकंती सुरू केली आहे. मनुष्य वस्तीत मदतीचे उपक्रम सुरू असताना पक्षी प्राण्यांचा अधिवास मात्र वंचित राहतो. ठाण्यातील एका आनंद दिघे प्रेमीने मात्र गेली अनेक वर्षे हा अधिवास जतन करण्यासाठी भुतदयेचा अखंड यज्ञ चालवला आहे.

धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक कुलकर्णी हे ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागात वंचित घटकांसाठी वर्षभर लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात. एवढेच नव्हे तर मुक्या पक्षी प्राण्यांसाठी देखील ते गेली अनेक वर्षे काम करत आहेत. येऊरमधील पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे आणि अन्नधान्य उपलब्ध करून देणारी त्यांची टीम गेली अनेक वर्षे कार्यरत असून सध्याच्या रखरखत्या उन्हात ही टीम अधिक सक्रिय झाली आहे.

येऊर भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवले की पक्षी आणि लहान प्राणी नागरी वस्तीकडे वळतात. त्यांना येऊरमध्येच अन्न आणि पाणी मिळावे यासाठी अशोक कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी अमित जाधव आणि टीम यांनी जागोजागी लहान लहान खड्डे करून त्यात पाण्याची व्यवस्था केली आहे. झाडांवरही त्यांनी पाण्याचे भांडे आणि ज्वारी, बाजरीसारखे धान्य उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे पक्ष्यांना अन्न-पाण्याची कमतरता जाणवत नाही. दर दोन-तीन दिवसांनी या भांड्यात आणि खड्ड्यांमध्ये अन्न आणि पाणी सोडले जाते.

याबाबत श्री. कुलकर्णी म्हणाले, केवळ येऊर भागातच नव्हे तर ठाणेकरांनी त्यांच्या घराजवळ असलेल्या झाडांवर अशी व्यवस्था करायला हवी. गरज पूर्ण करण्यासाठी माणसाला हाक मारता येते, पण पक्षी प्राण्यांमध्ये तशी सोय नसल्याने आपणच त्यांच्यापर्यंत जाऊनही ही सेवा द्यायला हवी, असेही ते म्हणाले.