सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांची प्रभाग रचनेवर हरकत
कल्याण : 1 फेब्रुवारी 2022 रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. तर याबाबत काही हरकती असल्यास 14 फेब्रुवारी 2022 रोजी पर्यंत नोंदवण्याचे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले होते. याबाबत ही प्रभाग रचनेची सुरवताच चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी करत हरकत नोंदवली आहे.
पॅनल पद्धतीच्या प्रभागाची रचना कशी असावी याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी 5 ऑक्टोबर 2021 रोजी प्रसिद्ध केल्या होत्या. या मार्गदर्शक सूचनांमध्ये कलम 7 मध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅनलची रचना ही महापालिकेच्या उत्तर दिशेपासून सुरुवात करून नंतर उत्तर पूर्वेस व त्यानंतर पश्चिमेस सर्वात शेवटी दक्षिणेस यावे असे नमूद केले आहे. पॅनलला क्रमांक सुद्धा त्याच क्रमाने द्यावेत असे नमूद केले आहे. मात्र प्रत्यक्ष पॅनेल रचना बघितल्यावर ज्या एजन्सीने ही प्रारुप पॅनल रचना केली आहे त्यांनी ती रचना उंबर्डे या गावापासून केलेली दिसते. मुळात उंबर्डे हे गाव महापालिकेच्या उत्तरेस नसून उत्तरेस मांडा-टिटवाळा हा भाग येतो. म्हणजेच प्रारूप पॅनल रचना ही मांडा-टिटवाळा पासून सुरुवात होऊन नंतर ती उंबर्डे गावापर्यंत येणे अपेक्षित होते. मात्र असे घडल्याचे दिसून येत नसल्याने याच गोष्टीला तांत्रिक विरोध करत घाणेकर यांनी आपली हरकत बुधवारी नोंदवली आहे.