तपास न करताच दिला पुरस्कार शेतकऱ्याने नाकारला आदर्श पशुपालक पुरस्कार

शहापूर : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून दिला जाणारा मानाचा पशुपालक पुरस्कार देतांना कोणतेही निकष न पाहता व कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवून दिला जात असल्याचा निषेध शहापुरातील एक शेतकऱ्याने केला आहे. त्याने त्याला मिळालेला पुरस्कारही परत केला आहे.
आदर्श पशुपालक पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी बबन हरणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, माझ्या शेतावर पशु वैद्यकीय अधिकारी (एलडीसी) किंवा तालुका पशुधन अधिकारी यांनी एकदाही भेट दिली नाही, मला कधी मार्गदर्शनही केले नाही, शासकीय योजनांबाबत कधी माहितीही दिली नाही किंवा शास्त्रशुद्ध पद्धतीने जनावरे पालन कसे करावे याचेही प्रशिक्षण दिले नाही. एवढेच काय, जनावरांचे लसीकरण योग्य वेळी होत आहे की नाही हे देखील पाहीले नाही. म्हणून तालुका पशुधन अधिकारी शहापूर यांचा निषेध नोंदवून ठाणे जिल्हा परिषदेने मला जाहीर केलेला आदर्श पशुपालक पुरस्कार मी नम्रपणे नाकारत आहे.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, तालुका पशुधन अधिकारी केवळ कार्यालयात बसून कसलीही पाहणी किंवा छाननी न करता जर पुरस्कारार्थी यांची निवड होत असेल तर ते योग्य नाही. यामुळे प्रामाणिक आणि मेहनती पशुपालकांवर अन्याय होत आहे. तथापि आदिवासी विकासासाठी शेकडो योजना राबवून देखील व पेसा क्षेत्र असलेल्या एकही आदिवासी पशुपालक शेतकऱ्यांचा गौरव जिल्ह्यात होत नसेल तर यापेक्षा शोकांतिका कोणती असेल असा संतप्त सवाल करुन पशुधन अधिकारी शासकीय योजना योग्य पद्धतीने राबवत नाहीत आणि पशुपालकांना योग्य मार्गदर्शन न करता केवळ कागदी घोडे नाचवत असल्याचा थेट आरोप पशुधन शेतकरी बबन हरणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केला. दरम्यान या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन कोणत्या दृष्टीने कार्यवाही करते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
याविषयी माझ्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. त्यांनी पुरस्कार का नाकारला याची चौकशी करुन कळवतो, असे जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ.समीर तोडणकर यांनी सांगितले.
स्पॉट व्हिजिट न करता तालुका पशुधन अधिकारी केवळ ऑफिसमध्ये बसून,कसलीही पाहणी,छाननी न करता पुरस्कारार्थी यांची निवड करत आहे.यामुळे प्रामाणिक आणि मेहनती पशुपालकांवर अन्याय होत आहे.माझ्या पशुधनाची एकदाही पाहणी न करता मला पुरस्कार जाहीर केला.हा पुरस्कार नाकारून मी तालुका पशुधन विकास अधिकाऱ्याच निषेध करतो-बबन हरणे,पशुपालक शेतकरी.