नवी मुंबई: उद्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्यांची आवक वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र मागील महिन्याच्या तुलनेत ही आवक कमी आहे. गुरुवारी बाजारात कोकणातील हाफुच्या ४३,३३६ पेट्या आंबा दाखल झाला आहे.
अक्षय तृतीयेपासून आंबा खाण्याचा प्रघात असल्याने हा सण साजरा करण्यासाठी घरोघरी ‘आमरस पुरीचा’ बेत केला जातो. यंदा शुक्रवारी अक्षय तृतीयेचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये हापूस आंब्याची आवक वाढेल,अशी अपेक्षा होती. मात्र बाजारात हापूसच्या ४२ हजार पेट्या दाखल झाल्या होत्या.
एपीएमसी बाजारात साधारण मार्च महिन्यापासून हापूसच्या हंगामाला सुरुवात होते. मार्च, एप्रिल आणि मे महिना असा हंगाम असून मे महिना शेवटचा हंगाम असल्याने आवक वाढून लाखाच्या घरात जाते. यंदा कोकणात आंब्याला पोषक वातारण तयार झाल्याने आंबा काढणीला लवकर आला. त्यामुळे एपीएमसी बाजारात मार्च महिन्यात हापूस आंबा पेट्यांनी ३५ हजारांचा पल्ला पार करत एप्रिलमध्ये ७० हजारांवर मजल मारली होती. त्यामुळे मे महिना आणि अक्षय तृतीया सणावर आवक वाढेल अशी अपेक्षा होती. मात्र आवक ही सरासरीपेक्षा कमी होती. त्यामुळे आंब्याचे दर अजूनही ५०० ते १००० रुपये डझनवर स्थिरावले असल्याने ऐन सणाला आंब्याला मागणी देखील तुरळक राहिली, अशी माहिती एपीएमसी फळ मार्केटमधील आंबा विक्रेता अक्षय खेबडे यांनी दिली.
कर्नाटकी आंब्याची आवक वाढली
वाशीतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस सोबतच कर्नाटकी आंब्याची आवक होत असते. ही आवक हापूसच्या तुलनेत २५ ते ३० टक्के असते. बाजारात आता कोकणातील आंब्याची आवक कमी झाली असून कर्नाटकी आंब्याची आवक वाढली आहे. गुरूवारी बाजारात कोकणातील हापूसच्या ४३,३३६ पेट्या तर कर्नाटकी आंब्याचे ३९,२७२ क्रेट दाखल झाले आहेत.