कोकणातील हापूसची आवक वाढली

एपीएमसी बाजारात १७५ पेट्या दाखल
एक पेटी सात ते बारा हजार रुपयांनी विक्री

नवी मुंबई : मागील आठवड्यात वाशीच्या एपीएमसी बाजारात कोकणातील हापूस आंब्याच्या २४ पेट्या दाखल झाल्या होत्या. आता आवक वाढून शनिवारी तब्बल १७५ पेट्या विक्रीसाठी दाखल झाल्या. चार ते सहा डझन पेटीला ७ ते १२ हजारांचा दर मिळाला आहे. त्यामुळे मार्च आधीच म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोकणातील हापूस आंब्याची चव चाखण्यासाठी ग्राहक आसुसलेले असतात. बाजारात हापूसचा मुख्य हंगाम मार्चमध्ये सुरू होतो. मात्र बाजारात तुरळक प्रमाणात हंगाम पूर्व हापूस हा जानेवारी, फेब्रुवारीमध्ये दाखल होतो. यंदा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात २४ पेट्या दाखल झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच तारखेला १७५ पेट्या आवक झाली आहे. मागील आठवड्यात हापूसच्या २४ पेट्या दाखल झाल्या होत्या, तेव्हा १०-१५ हजार रुपयांनी पेटीची विक्री झाली आहे. शनिवारी दाखल झालेल्या हापूसच्या एका पेटीतील चार ते सहा डझनला सात हजार ते १२ हजार रुपये बाजारभावाने विक्री झाली आहे.

यंदा हवामान बदल, कडाक्याची थंडी यामुळे सुरुवातीला फळधारणा झाली नाही तर काही मोहोर गळून पडला. थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावाचाही फटका बसला त्यामुळे औषध फवारणी खर्च वाढला. परिणामी खवय्यांना हापूसची चव चाखण्यासाठी १५ मार्चपर्यंत वाट पहावी लागणार असून दर देखील सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, अशी माहिती येथील व्यापाऱ्यांनी दिली.