भिवंडी: भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या लग्नसराई सुरु असून रात्री उशिरा चालणाऱ्या हळदी समारंभावर ग्रामीण पोलिस अधिकारी आक्षेप घेत आहेत मात्र रात्री उशिरा सुरु राहणाऱ्या महामार्गावरील ढाब्यांवर अधिकारी कारवाई करीत नसल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील नागरिक करीत आहेत.
भिवंडी ग्रामीण क्षेत्रात भिवंडी तालुका, गणेशपुरी आणि पडघा पोलीस ठाणे असे तीन पोलीस ठाणे येत असून या तीन पोलीस ठाण्यावर नियंत्रण करण्यासाठी अंबाडी आणि भिवंडी वडपे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय आहे. येथील ग्रामीण भागात सध्या लग्नाच्या हळदीचे कार्यक्रम गाजत असून या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत लग्नघरात हा आनंद साजरा केला जात आहे. असे असताना काही पोलीस अधिकारी थोडा उशिरा सुरु असलेल्या या आनंदात विरजण आणण्याचे काम करीत असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यातील भिवंडी, गणेशपुरी आणि पडघा या तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या संख्येने ढाबे असून रात्री उशिरापर्यंत हे धाबे सुरु असतात. त्यापैकी भिवंडीच्या मुंबई-नाशिक आणि भिवंडी-नाशिक महामार्गावर असलेल्या वडपे गावाजवळ रात्री उशिरापर्यंत चालणारे ढाबे आहेत. हे कार्यक्षेत्र भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून याबाबत नागरिकांकडून नेहमी तक्रारी केल्या जात आहेत.
काही वर्षांपूर्वी भिवंडी-नाशिक मार्गावरील एका ढाब्यावर एकाची हत्या झाली होती. तर कधी छोटी-मोठी भांडणे देखील होत असतात. यापैकी काही ढाब्यांमध्ये अवैधपणे हुक्का पार्लर देखील सुरु आहेत. तर लपून-छपून दारू पिण्याचे प्रकार देखील सुरु आहेत. असे असताना या उशिरापर्यंत चालणाऱ्या ढाब्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे. नागरिकांनी तक्रार केल्यावर या ढाब्याबाहेरील रोषणाई बंद करून आतील भागात रात्री उशीरापर्यंत हे ढाबे सुरु ठेवले जातात. असे अवैधपणे सुरु असलेले व्यवसाय बंद करून रात्री नियमानुसार वेळेत सर्व ढाबे बंद करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या बाबत पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल झलटे यांच्याशी मोबाईलवर संपर्क होऊ शकला नाही.
भिवंडी तालुक्यातील सर्व व्यावसायिकांना व ढाब्यांना रात्री ११-३० वाजता बंद करण्याच्या सख्त सूचना दिल्या आहेत. तरी देखील भिवंडी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-नाशिक आणि भिवंडी नाशिक मार्गावरील ढाब्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास कदम यांनी सांगितले.