ठाणे : ठाणे शहरातील वाढती वाहने आणि त्यांचा धूर तर इमारतींची बेसुमार बांधकामे यामुळे ठाण्याची हवा प्रदूषित झाली असून ठाणेकरांचा श्वास गुदमरू लागला आहे. विशेष म्हणजे वाहनांची सततची वर्दळ, बांधकामे यांच्या जोडीला मेट्रोची भव्य बांधकामे यामुळे घोडबंदर परिसर सर्वाधिक घुसमटू लागला आहे. दिल्ली, मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील बिघडू लागल्याने ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात श्वसनाचे विकार जडू लागले आहेत.
ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाकडील नोंदीनुसार ठाणे शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स डिसेंबर महिन्यात खालावत चालली असल्याचे समोर आले आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या काळात सर्वात कमी असलेला हवा गुणवत्ता निर्देशांक, पंधरवड्यानंतर १८३ एवढा नोंदवण्यात आला आहे. हा हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम प्रदूषित या वर्गवारीमध्ये येत असला तरी नवीन ठाणे समजल्या जाणाऱ्या घोडबंदर येथे हवेची पातळी अत्यंत खालावली आहे. घोडबंदरच्या हवेची गुणवत्ता १९० वर पोहचली आहे तर उपवन परिसरात १७६ एवढी गुणवत्ता नोंदविण्यात आली आहे.
एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ठाणे शहरात हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १८३ नोंद झाला आहे. विशेष म्हणजे घोडबंदर भागातील हवा सर्वात जास्त खराब असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. या भागात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या तसेच इमारतींच्या बांधकामामुळे हवेत बदल झाले असल्याचे बोलले जात आहे.
एअर क्वालिटी इंडेक्सनुसार ० ते ५० एअर क्वालिटी इंडेक्सची नोंद झाल्यास हवेची गुणवत्ता चांगली असल्याचा निष्कर्ष काढला जातो.५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम गुणवत्ता, २०१-३०० प्रदूषित, ३०१ ते ४०० अत्यंत प्रदूषित आणि ४०१-५०० गंभीर स्वरुपाचे प्रदूषण मानले जाते.
ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत, हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ठाणे महापालिकेची हेल्पलाईन (८६५७८८७१०१) सुरू केली आहे. हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सॲप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे तसेच विविध विकासकामांमुळे आणि धुळ,धुराच्या व्याप्तीने शहरात वायु प्रदुषणाची पातळी काही अंशी वाढली आहे. मात्र हे प्रमाण गेल्या दोन वर्षांपेक्षा तुलनेने कमी आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १८३पर्यंत पोहचला असल्याने सद्या तरी ठाण्याची हवा मध्यम प्रदूषित स्तरावर आहे, अशी माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे.