पाच जणांच्या हत्येतील आरोपीला २८ वर्षांनी अटक !

भाईंदर : मीरारोड येथील एकाच कुटुंबातील पाच जणांच्या  हत्येप्रकरणी तब्बल २८ वर्षांपासून फरार तीन आरोपींपैकी एकास अटक करण्यात काशिमिरा गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीसांना यश मिळाले आहे.
पेणकर पाडा मिरारोड येथील चाळीमध्ये राहणाऱ्या प्रजापती कुटुंबातील जगराणी देवी प्रजापती हिचे शेजारी राहणाऱ्या अनिल सरोज व सुनील सरोज यांच्या बरोबर भांडण होत असे. त्याचा राग मनात ठेवून १७ नोव्हेंबर १९९४ रोजी जगराणी देवी प्रजापतीसह तिची पाच वर्षे, तीन वर्षे, दोन वर्षे आणि तीन महिन्यांच्या एकूण चार मुलांची चाॅपर व सुऱ्याचे वार करुन हत्या करण्यात आली होती.
सदर हत्येबाबत तक्रारदार व मयत जगराणी देवीचा पति राजकुमार प्रजापतीच्या तक्रारीवरून अनिल सरोज, सुनील सरोज व राजकुमार अमरनाथ चौहान या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फरार असल्याने गुन्ह्याचा तपास थंडावला. २०२१ मध्ये सदर हत्या प्रकरणी पुन्हा शोध मोहीम सुरू झाली. त्यामध्ये राजकुमार चौहान हा कामानिमित्त सौदी अरेबिया, अबुधाबी, कतार अशा ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लुक आऊट नोटीसही जारी केली.
राजकुमार चौहान हा २९ डिसेंबर २०२२ रोजी परदेशातून परत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने राजकुमार चौहान विमानतळावर उतरताच इमिग्रेशन पोलिसांनी राजकुमारला ताब्यात घेऊन काशिमिरा पोलिसांकडे सोपविल्याची माहिती डीसीपी अविनाश अंबुरे यांनी पत्रकारांना दिली.