जर्मनीतील ‘त्या’ चिमुकलीची आई-वडिलांशी भेट होणार

खासदार म्हस्के यांचा पाठपुरावा

नवी दिल्ली : भारतीय वंशाची साडेतीन वर्षांची अरिहा गेल्या ३६ महिन्यांपासून जर्मनीच्या पाळणाघरात आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नाने ती लवकरच आई-वडिलांच्या कुशीत असणार आहे. परराष्ट्र मंत्रालय याबाबत युद्धपातळीवर कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे.

भावेश शाह आणि धारा शाह हे मूळचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील मीरा भाईंदर विभागातील रहिवासी आहेत. गेली अनेक वर्षे ते जर्मनी येथे कार्यरत आहेत. त्यांची मुलगी अरिहा ही सात महिन्यांची असताना किरकोळ मारहाण केल्याचा ठपका ठेवत जर्मन सरकारने अरिहाला फोस्टर केअर सेंटरमध्ये अर्थात पाळणाघरात ठेवले आहे. याबाबत खासदार म्हस्के यांना माहिती मिळाल्यानंतर म्हस्के यांनी मुलीचा आईवडिलांकडे ताबा मिळवून देण्यासाठी संसदेत आवाज उठवला होता. म्हस्के यांच्या मागणीला सभागृहात विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनीही पाठिंबा देत अरिहाचा ताबा भारत सरकारने घ्यावा,अशी एकमुखी मागणी केली होती.

पोलिसांच्या तपासात अद्याप मुलीला मारहाण केल्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही जर्मनीच्या युथ वेल्फेअर ऑफिसने (जुगेंडमॅट) अरिहाला शाह कुटुंबाकडे परत करण्यास नकार दिला आहे. सप्टेंबर २०२१ पासून हे कुटुंब अरिहासाठी कायदेशीर लढाई लढत आहे, मात्र त्यांना कोणताही आधार मिळत नसल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहात व्यक्त केली होती.

खासदार म्हस्के यांच्या प्रयत्नांनामुळे परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली असून जर्मन न्यायालयात कायदेशीरबाबी पूर्ण केल्या जात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने पाठपुरावा केल्यानंतर आता भावेश शहा आणि धारा शहा या आईवडिलांना आठवड्यातून दोनदा मुलीला भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मुलीला मंदिरातही घेऊन जाण्याची तयारी जर्मन सरकारने दाखवली आहे.

दरम्यान, याप्रकरणी खासदार नरेश म्हस्के येत्या दोन दिवसात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेणार आहेत. जर्मन सरकारने मुलीचा ताबा सध्या आईवडिलांकडे न देण्याचा निर्णय घेतल्यास, भारत सरकारने मुलीचा ताबा घ्यावा, अशी मागणी ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार आहेत. भारतात लहान मुलींचे संगोपन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. गुजरात, मुंबई आणि ठाणे परिसरातल्या संस्थांनीही मुलीचे संगोपन करण्याची तयारी दर्शवली आहे. अशा संस्थांकडेही अरिहाचा ताबा दिला जाऊ शकतो, अशी विनंतीही ते परराष्ट्र मंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. खासदार म्हस्के यांच्या या भावनिक कार्याची देशभरात चर्चा होत असून जैन धर्मियांनीही त्यांचे आभार मानले आहेत.