ठाणे: राज्यात तापमानाचा पारा वाढला असून फेब्रुवारी महिन्यातच आग ओकणाऱ्या सूर्यदेवामुळे वैशाखाच्या झळा नागरिकांना बसू लागल्या आहेत. राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यात बुधवारी कमाल तापमानाचा पारा ३९ अंशावर नोंदविला गेला.
वाढत्या नागरीकरणाबरोबरच ठाण्यात अनेक प्राकृतिक बदल होत आहेत. टॉवर संस्कृतीमुळे उंचचउंच इमारती उभ्या राहत असून मेट्रो व इतर विकास प्रकल्पांची कामे सुरु असल्याने शहरातील नैसर्गिक संपदा लोप पावत आहे. शहरातील बहुतांश रस्ते सिमेंट-कॉंक्रीटचे बनल्याने मातीशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे मत पर्यावरण तज्ञ व्यक्त करतात. गेल्या आठवड्याभरात उन्हाचा पारा ३७ ते ३९ अंश सेल्सियसच्या वर पोहचल्याची नोंद ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे झाली आहे.
उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने या कालावधीत रस्त्यावरील वर्दळ रोडावलेली दिसून येत आहे. उन्हापासून संरक्षण करण्यासाठी नागरिक टोप्या, मोठे रुमाल, स्कार्फ व गॉगल वापरत आहेत. महिलावर्ग तोंडाला स्कार्फ लावून अथवा हातात छत्री घेऊन जाताना दिसत आहेत. २२ व २३ फेब्रुवारी रोजी पारा ३८ अंशापार तर २५ फेब्रुवारीला ३९ अंश आणि व २६ फेब्रुवारी रोजी सर्वाधिक म्हणजेच कमाल तापमान ३९.०२ अंश सेल्सियस इतकी नोंद झाल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडून देण्यात आली.
रात्री गारवा तर दिवसा उष्मा असे बदल वातावरणात जाणवत आहेत. सर्वसाधारणपणे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे चार महिने हिवाळा असतो. त्यानंतर होळी झाल्यावर वातावरणात उकाडा जाणवतो. पण गेल्या काही वर्षात ऋतूमान कूस बदलत असल्याने वातावरणात बदल जाणवत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंशावर स्थिरावत असताना फेब्रुवारीच्या अखेरीस पारा ३९ अंशापार गेल्याने उष्म्यात भर पडली असून हवामान विभागाने पुढील २४ तास उष्णतेच्या लाटा उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे.
तापमान तक्ता (अंश सेल्सियसमध्ये)
दिवस किमान कमाल
२२ फेब्रु. २५.०२ ३८.०७
२३ फेब्रु २५.०० ३८.०८
२४ फेब्रु. २५.०७ ३७.०८
२५ फेब्रु. . २५ .०९ ३९.००
२६ फेब्रु. . २५ .०२ ३९.०२