ठाण्याची वाटचाल कचरामुक्तीकडे

* भंडार्लीचे डम्पिंग मे मध्ये सुरू होणार
* डायघर वीजनिर्मिती प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्षअखेर पूर्ण होणार

ठाणे : ठाणे महापालिकेचा महत्वाकांक्षी घनकचरा प्रकिया प्रकल्प प्रगतीपथावर असून भंडार्ली येथील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प मे महिन्यात सुरु तर डायघर मुख्य घनकचरा प्रकल्पाचा पहिला टप्पा या वर्षाअखेर पूर्ण होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले.

आज या सर्व प्रकल्पास त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त मनीष जोशी, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील, आगर व्यवस्थापक दिलीप कानडे तसेच इतर महापालिका अधिकारी आदी उपस्थित होते.

ठाणे महापालिकेचा डायघर घनकचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु होणार असून भंडार्ली येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणारा तात्पुरता प्रकल्प उभा करण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मौजे भंडार्ली येथील खासगी जागा तात्पुरती भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या भंडार्ली येथील जागेवर कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार असल्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही, दुर्गंधी येणार नाही याची विशेष काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यावेळी नमूद केले.

प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून वाहनांना ये-जा करण्यासाठी मुख्य रस्त्याचे काम सुरू असून जागेच्या सभोवताली कुंपण बांधणे, पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी चर खोदणे, बोअरवेल खोदणे व साईट ऑफिस उभारणे व एमआरएफ मशिन उभारणी करणेकरिता प्लॅटफॉर्म तयार करणे, कंपोस्टिंग विंड्रो सरफेस तयार करण्याचे काम सुरू असून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या ठिकाणी तीन एमआरएफ मशीन कार्यान्वित राहणार असून प्रत्येक मशीनची ३५० टन क्षमता असून जवळपास १००० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. हा प्रकल्प मे महिन्यात पूर्ण करून प्रथम दोन एमआरएफ मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिकेचा महत्वाकांक्षी डायघर येथील घनकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पांची देखील महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी पाहणी करून आढावा घेतला. या प्रकल्पामध्ये बंदिस्त पध्दतीने कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असून दुर्गंधी बाहेर जाऊ नये म्हणून निगेटिव्ह प्रेशर तंत्राचा वापर करण्यात येणारा आहे. प्रकल्प ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता, वृक्ष लागवड आणि संरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. सदरचा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर या प्रकल्पातून १३ मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. या सर्व प्रकल्पाचे स्थापत्य काम प्रगतिपथावर असून या वर्षाअखेर कार्यान्वित करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील एमआरएफ मशिन परदेशातून येणार असून याचा कार्यादेश देण्यात आला आहे. मे महिन्यात या मशीन येण्याची शक्यता असून सहा विभागात मशीन कार्यान्वित करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षाअखेर एमआरएफ सुविधा सुरु करण्यात येणार आहे.

दरम्यान बांधकाम आणि तोडफोड साहित्याचा पुर्नचक्रीकरण प्रकिया प्रकल्पाची देखील पाहणी करून प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील रस्त्यावरील डेब्रीज तत्काळ उचलून प्रकिया ठिकाणी आणावे, डेब्रीज उचलण्यास विलंब झाल्यास संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ईशाराही महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यावेळी दिला.