शहरात भाजपचा जल्लोष
ठाणे : भाजपला पुन्हा एकदा गुजरात हाती ठेवण्यात यश आले आहे. या विजयात ठाण्यातील भाजपचा खारीचा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखालील टीमला जबाबदारी दिलेल्या सुरतमध्ये भाजपला 100 टक्के यश मिळाले आहे. त्यामुळे आज ठाण्यातील भाजप कार्यालयासमोर झालेल्या जल्लोषाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
गुजरातमधील भाजपच्या एक हाती विजयानंतर गुरुवारी ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ढोल वाजून त्याच्या तालावर ठेका धरत नाचत आनंद साजरा केला. यावेळी, बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, मोदी आणि त्यांच्या विकासाच्या मॉडेलशिवाय मतदार काहीही बघायला तयार नाहीत. गुजरातच्या विजयात ठाण्याचा खारीचा वाटा आहे, असेही श्री. केळकर यांनी आवर्जून सांगितले. तर, विजयाची ही घोडदौड अशीच राज्यात आणि ठाण्यात सुरू राहणार आहे, असा विश्वासही आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
गुजरात निवडणुकीत सुरतमधील सहा मतदार संघांची जबाबदारी ठाण्यातील भाजपचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना दिली होती. आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस संदीप लेले आणि अन्य तेथे ठाण मांडून होते. आमदार केळकर स्वतः पाहत असलेल्या ओलपाड मतदार संघात भाजपचे मुकेश पटेल हे दीड लाखांच्या मताधिक्क्याने निवडून आले. २०१७मध्ये पटेल यांना ६० हजारांचे मताधिक्य मिळाले होते.