ठाणे : बालेवाडी येथील राज्य ॲथलेटिक्स स्पर्धेत शौर्या हिने १६ वर्षाखालील मुलींच्या ६० मी धावणे या शर्यतीमध्ये ७.५८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वीचा राज्य विक्रम ७.९५ सेकंद असून राष्ट्रीय विक्रम ७.७७ सेकंद इतका आहे.
महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स स्पर्धा यावर्षी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या. या वर्षीच्या क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या शौर्या अंबुरे हिने क्रीडाप्रेमींचं विशेष लक्ष वेधून घेतले.
शौर्या हिने १६ वर्षाखालील मुलींच्या ६० मी धावणे या शर्यतीमध्ये ७.५८ सेकंदाचा नवीन विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. तसेच ८० मिटर अडथळा शर्यतीत सुद्धा तिने ११.४७ सेकंदाचा नवा राज्य विक्रम नोंदवून सुवर्णपदक पटकावले. यापूर्वीचा राज्य विक्रम ११.७६ सेकंद आहे व राष्ट्रीय विक्रम ११.५ सेकंद इतका आहे. ठाण्याच्या शौर्याने एकापाठोपाठ एक असे दोन विक्रम नोंदवल्याने क्रीडाजगतामध्ये तिचे कौतुक होत आहे.
शौर्या ही ठाण्याच्या युनिव्हर्सल हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी असून ती ज्येष्ठ क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांच्याकडून त्यांच्या एम स्पोर्ट्स अँड फिटनेस ॲकॅडमीमध्ये गेली आठ वर्षे प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांनी आतापर्यंत अनेक जागतिक स्तरावरचे खेळाडू घडवले आहेत व त्यांच्या एम स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी विविध क्रीडा उपक्रम राबवत असतात.