आ. संजय केळकर यांची संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १८वा आंबा महोत्सव १ मेपासून
ठाणे : चोखंदळ आणि खवय्या ठाणेकरांचे लक्ष लागून राहिलेला १८वा आंबा महोत्सव येत्या १ मेपासून सुरू होत आहे. आमदार संजय केळकर यांची संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केले आहे.
१ ते १२ मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणाऱ्या या आंबा महोत्सवात, कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. या महोत्सवात धान्याचे पाच स्टॉल असणार असून महिला बचत गटांचेदेखील पाच स्टॉल असणार आहेत. हा महोत्सव केवळ बाजार नसून शेतकरी आणि ग्राहकांना दिलासा देणारी एक चळवळ आहे. शेतकऱ्यांना हात देताना सर्वसामान्य ठाणेकरांनाही दर्जेदार हापूस आंबा विकत घेऊन त्याचा आस्वाद घेता यावा, यासाठी ही चळवळ गेली १८वर्षे सुरू असल्याची माहिती संस्कार संस्थेचे अध्यक्ष व महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कोकण पदवीधर मतदार संघातील आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, माजी उपमाहापौर अशोक भोईर, सुभाष काळे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, संतोष साळुंखे, विष्णू रानडे उपस्थित होते.
कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. २०२२ साली कोकणातील आंब्याचे उत्पादन ३,२०,००० मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पादन घटत जाऊन २०२३ मध्ये २,५६,००० मेट्रीक टन आणि २०२४ मध्ये १,२८,००० मेट्रीक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला.
यावर्षी अवेळी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडतुडा किटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्केच आंबा पीक हाती लागले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी पहलगाम येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.