हटवलेल्या टपऱ्या-हातगाड्यांनी पुन्हा अडवला ठाणेकरांचा रस्ता

ठाणे: नागरिकांच्या रेट्यानंतर महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील कचराळी तलावालगत असलेली बेकायदा टपरी आणि सर्कल लगतच्या खाद्य पदार्थांच्या गाड्या हटवण्यात आल्या आणि स्वयंघोषित स्थानिक पुढाऱ्यांच्या मनमानीनंतर पुन्हा टपऱ्या अन आणि हातगाड्या उभ्या राहिल्या. एकूणच हे पुढारी आणि कर्मचारी यांच्यामुळे या शहराला विद्रुपीकरणापासून कोणीही वाचवू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
दोन महिन्यांपूर्वी कचराळी तलावालगत उभ्या राहिलेल्या बेकायदा टपरीबाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली होती. या एका टपरीमुळे भविष्यात तलावाभोवती अतिक्रमणांचा विळखा पडण्याची भीती व्यक्त होती. तक्रारीनंतर सुरुवातीला महिनाभर कारवाई कोणी करायची यावर काथ्याकूट झाला होता. अखेर २५ दिवसांपूर्वी ही टपरी पूर्णपणे हटवण्यात आली.
दुसरीकडे येथील सर्कळजवळ असलेल्या हातगाड्या आणि फूडव्हॅनमुळे रस्ते अडवले जात असून पादचाऱ्यांना चालणे दुरापास्त झाले होते, परिणामी नागरिकांच्या डोक्यावर सतत अपघातांची टांगती तलवार होती. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी सातत्याने पाठपुरावा केला, परंतु प्रशासनाने सातत्याने चालढकल केली. अखेरीस वृत्त प्रकाशित झाल्यानंतर कर्मचारी कारवाई करण्यास गेले. त्यावेळी स्थानिक पुढाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास मनाई केली. किमान या पुढाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत होते. पण या कार्यकर्त्यांवर कारवाई नाही आणि अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे या तथाकथित आणि स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या मनमानीमुळे तलावालगतची टपरी पुन्हा दिमाखात उभी राहिली आणि परिसरात फूड व्हॅन, हातगाड्यांची संख्या आणखी वाढली.
एकूणच शहरात कोणीही आणि कुठेही टपरी उभारा, गाळे बांधा, हातगाड्या लावा, प्रशासनाकडून ठोस कारवाई होणार नाही. उलट अतिक्रमणांना संरक्षण देण्यासाठी तथाकथित कार्यकर्ते ‘अटी-शर्थीं’सह सज्ज असतील, शहर सौंदर्यीकरण करणाचे व्हायचे ते होवो!