Thanevaibhav Online
22 September 2023
अवघ्या २०२ मूर्ती सुपूर्द
ठाणे: दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देताना ठाणेकरांनी कृत्रिम तलावांना पसंती देत पर्यावरणाला साथ दिली. दुसरीकडे मात्र ठाणे महापालिकेने सर्व दहा प्रभागातील विसर्जन ठिकाणी उभारलेल्या स्वीकृत गणपती मूर्ती केंद्रांपैकी केवळ पारसिक येथे २०२ मूर्ती भाविकांनी सुपूर्द केल्या आहेत.
मूर्ती विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण रोखण्यासाठी कृत्रिम तलाव ही संकल्पना पुढे आली. यावर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवून ती ४२ करण्यात आली. तर दुसरीकडे मूर्ती स्वीकृती केंद्र उभारून नवीन आदर्शही ठाणे पालिकेने पुढे ठेवला. पण पर्यारवणपुरक गणेशोत्सव साजरा करणार्या ठाणेकरांचा अद्यापही या केंद्रांना हवा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही स्वीकृत केंद्रांवर मुर्ती सुपूर्द करणार्यांची संख्या नगण्यच दिसून आली.
पर्यावरणपुरक पण विधीवत विसर्जन
जवाहर बाग, कोपरी, वागळे, बाळकूम, मुंब्रा आणि पाचपाखाडी या सहा अग्निशमन दलाच्या अख्यारीत २२ तलाव आणि घाट या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी या विविध ठिकाणी सुमारे ११,९१० गणपतींचे विसर्जन झाले. यामध्ये ११,६९७ घरगुती तर ११ सार्वजनिक गणपतींचा समावेश होता. याशिवाय शेकडो ठाणेकरांनी घरात पिंपात किंवा छोट्याशा हौदामध्येही विधीवत गणेशाचे विसर्जन केले. पर्यारवणाचा समतोल राखत विसर्जनाला पसंती देण्यात आली.
केंद्रांमध्ये शुकशुकाट
मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका,-नौपाडा, जेल तलाव-उथळसर, देवदयानगर शिवाईनगर-वर्तकनगर, कामगार रुग्णालय-लोकमान्यनगर, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका-वागळे इस्टेट प्रभाग समिती, रिजन्सी हाईटस आझादनगर, लोढा लक्झेरिया-माजिवडा आदी ठिकाणी ठाणे महापालिकेने स्वीकृत मूर्ती केंद्रांची व्यवस्था केली होती. दीड दिवसांच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासूनच स्वयंसेवी कार्यकर्ते या केंद्रांमध्ये हजर होते. पण एकही गणेशभक्त मूर्ती सुपूर्द करण्यासाठी फिरकला नाही. केवळ मुंब्य्रातील पारसिक घाट येथेच २०२ मूर्ती स्वीकृत झाल्याची नोंद आहे.