ठाणेकरांना पाहायला मिळणार तेंडुलकर, लारा यांची फटकेबाजी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा आयपीएलचे सामने होणार नसले तरी सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांसारख्या सहा दिग्गजांचा समावेश असलेले सामने मे अखेर स्टेडीअमवर होणार आहेत. सोमवारी त्यासाठी संबंधितांकडून या स्टेडीअमची रेकी देखील करण्यात आली आहे.

दादोजी कोंडदेव स्टेडियमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांच्या दर्जाचे बनविण्याचे तयारी गेल्या महिन्यापासून सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी तसेच, लाईव्ह एच डी प्रक्षेपण करण्यासाठी तीन हजार एलयुएक्स क्षमतेइतकी प्रकाशव्यवस्था देखील सज्ज झाली आहे. त्यासाठी चार भव्य खांब उभारले गेले आहेत. स्टेडियममध्ये, गळतीमुळे खराब झालेले छत बदलण्यात आले आहेत तसेच, प्रेक्षागृहातील १०० पत्रकार बसू शकतील अशा प्रेस बॉक्सची जागाही सज्ज झाली आहे. तसेच अत्याधुनिक स्वरुपाचे चेंजीग रुमही सज्ज झाले आहेत. एकूणच दादोजी कोंडदेव स्टेडीअमने आता कात टाकली आहे. या ठिकाणी आता यंदा पाहिल्यांदाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची मान्यता असलेल्या आयपीएलचे काही सामने होणार होते. येत्या २५ मे ते ७ जून २०२३ या कालावधीत याच स्टेडीअमवर आता क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंचे सामने रंगणार आहेत. रोड स्फेटी अंतर्गत हे सामने दरवर्षी खेळविले जातात. त्यानुसार ठाण्याला देखील या सामन्यांचा पहिल्यांदा मान मिळाला आहे. यात सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे एकमेकांना भिडताना पहावयास मिळणार आहेत. याशिवाय मोहम्मद कैफ, इरफान पठाण, सनथ जयसुर्या, मुथया मुरलीधरन आदींसह इतरही दिग्गज खेळाडू या मैदानात आपली जादू दाखविणार असल्याची माहिती महापालिकेच्या क्रिडा विभागाने दिली. भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या तीन संघातील सामने येथे होणार असल्याची माहिती क्रिडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.