आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी दादोजी कोंडदेव स्टेडीअम होऊ लागले सज्ज
ठाणे: ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्डेडीअम आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांसाठी सज्ज होऊ लागले असून जानेवरीनंतर आयपीएलचे सामनेही रंगणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
१९८६ साली दादोजी कोंडदेव स्टेडियमवर रणजी करंडक सामनेही झाले होते. त्यानंतर काही कारणाने येथे क्रिकेटचे सामने झालेच नाहीत. ही संधी तब्बल ३५ वर्षांनी बीसीसीआयच्या विजय हजारे ट्रॉफीच्या माध्यमाने मिळाली. त्यानंतर बीसीसीआयने या स्टेडीअमला पसंती देत आयपीएल खेळाडूंच्या सरावाला सुरुवात केली.
या स्टेडियमवर आयपीएलचेच नव्हे तर इतर क्रिकेटचे सामनेही भरवता यावेत यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. नगरविकास विभागातून निधीची तरतूद करून त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या दुरुस्तीचे काम सुरू केले.
रात्र-दिवस सामने भरवण्यासाठी आवश्यक असणार्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन हजार लक्झचे हायमास्क फ्लड लाईट बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी १८ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. सहा कोटीं खर्च करून पत्र्यांची शेड बसवण्यात येत आहे. याशिवाय प्रेस बॉक्स बनवण्यात येत आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेच्या क्रिडा विभागाच्या अधिकारी मिनल पालांडे यांनी दिली.