ठाणेकर करदाते तत्पर अन् दक्ष; पहिल्याच दिवशी भरले १८० लक्ष

ठाणे: ठाण्यातील दक्ष आणि तत्पर करदात्यांनी नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटी ८० लाखांचा मालमत्ता कर भरून कर्तव्य बजावले. विशेष म्हणजे अनेक करदात्यांनी सकाळीच कर संकलकांना फोन करून बिल जनरेट झाले नसल्याची तक्रार केली आणि बिल ऑनलाईन मिळताच करही भरला. आज अशा १५७० करदात्यांनी आदर्श ठाणेकरांची भूमिका बजावली.

१ एप्रिल रोजी पहिल्याच दिवशी मालमत्ता कर भरून आदर्श निर्माण करणाऱ्या करदात्यांना प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने अशा करदात्यांचे नाव आणि फोटो ठाणेवैभवमध्ये प्रसिद्ध करून कौतुक करण्यात येणार आहे. करदात्यांनी ९८९२३१६३२० या व्हॉट्सॲपवर नाव, फोटो आणि कर पावती पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठाणे महानगरपालिकेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके १ एप्रिल रोजीच करदात्यांपर्यंत पाठवली आहेत. त्याबद्दलचा लघुसंदेश (एसएमएस) मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यास सुरुवात झाली आहे. त्याला प्रतिसाद देत सुमारे १५७० जागरूक ठाणेकर करदात्यांनी आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक कोटी ८० लाख रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

मोबाईलवर पाठवण्यात आलेल्या लघुसंदेशात सन २०२५-२६ या वर्षांची देयके डाऊनलोड, छपाई (प्रिंट) करणे तसेच इंटरनेटच्या माध्यमातून (ऑनलाईन पध्दतीने) मालमत्ता कर भरणेकरिता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, प्रभाग कार्यालयाकडील मालमत्ता कर संकलन केंद्रावर मालमत्ता कर भरणेच्या सुविधेसह सुरुवात करण्यात आली आहे. सर्व करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रांवर सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजता या कालावधीमध्ये जमा करु शकतात.

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाची देयके छपाई करुन प्रभाग स्तरावर करदात्यांस वितरीत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामध्ये काही कालावधी अभिप्रेत आहे. करदाते कराची देयके महापालिकेच्या संकेतस्थळावरुन तसेच कर संकलन केंद्रावरुन विनंतीद्वारे उपलब्ध करुन घेवू शकतील, असे उपायुक्त (मालमत्ता कर) जी. जी. गोदेपुरे यांनी सांगितले.

दरम्यान, पहिल्या सहामाहीच्या मालमत्ता कराच्यासोबत दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रित महापालिकेकडे जमा केल्यास कालावधीनिहाय दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करामध्ये करदात्यांना सवलत देण्यात आली आहे. १ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या काळात पूर्ण रक्कम भरल्यास १० टक्के सूट, १६ जून २०२५ ते ३० जून २०२५ या काळात पूर्ण रक्कम भरल्यास चार टक्के सूट, १ जुलै २०२५ ते ३१ जुलै २०२५ या काळात पूर्ण रक्कम भरल्यास तीन टक्के सूट आणि १ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ या काळात पूर्ण करभरणा केल्यास दोन टक्के सूट देण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी विहित मुदतीत मालमत्ता कर भरुन उपरोक्त सवलतीचा लाभ घ्यावा. ऑनलाईन पध्दतीने मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसेच Googlepay, PhonePe, PayTm, BHIM App याद्वारे कर भरण्याची सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन दिली आहे.