ठाणे : आज बुधवारी सकाळी बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. कापूरबावडी नाका ते फाऊंटन हॉटेलपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
घोडबंदर मार्गांवर बोरिवलीच्या दिशेच्या मार्गीकेवर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यातच मागील काही दिवसांत पडत असलेल्या पावसामुळे बुधवारी सकाळी येथून जाणाऱ्या वाहनांचा वेग मंदावला गेला. परिणामी या मार्गांवर अगदी दुपारीही नागला बंदरपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर मार्गांवर अगदी वाघबीळपासून पुढे मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. परिणामी येथून प्रवास करतांना वाहन चालकांना गाडीचा वेग अत्यंत कमी ठेवावा लागतो. वेग मंदावल्यावर या मार्गांवर एका मागोमाग एक वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. त्यातच या ठिकाणी वर्सोवा पुलाचेही काम सुरु असल्याने गुजरातकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असते. परिणामी मागील तीन महिन्यापासून सातत्याने या मार्गांवर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
बुधवारी सकाळी तर थेट कापुरबावडी नाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती. त्याने बोरिवलीच्या दिशेने कामानिमित्त जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे याचा फटका ठाणे शहराच्या दिशेने येणाऱ्या वाहनांनाही बसला. मानपाडा येथे दोन्ही बाजूने काही प्रमाणात कोंडी झाली होती. यातून मार्ग काढतांना वाहनचालकांच्या नाकी नऊ आलें होते.