Thanevaibhav Online
16 September 2023
ठाणे : कर्करोग रुग्णालयास आमचा विरोध नाही, परंतु सर्वसामान्य रुग्णांना दैनंदिन उपचाराची सोय असणेही अधिक आवश्यक आहे,’ असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ग्लोबल रुग्णालय जितोच्या ताब्यात देण्यास विरोध कायम असल्याचे स्पष्ट केले.
‘जितो’सारख्या श्रीमंत संस्थेला तयार इमारत देण्यापेक्षा या जागेत कळवा रुग्णालयाचा विस्तार व्हावा. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय नव्याने बांधण्याचा घाट घालणे ठामपावर आर्थिक बोजा वाढवणारे आहे. अशी गुंतवणूक ‘जितो’ने स्वतःच्या हिमतीवर करावी,’ असेही श्री. जाधव म्हणाले.
याप्रकरणी आपण न्यायालयात जाऊन महापालिकेला आव्हान देण्याचा विचार करीत आहोत, असे सांगून जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकडे लक्ष दिले गेले तर ते अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकेल अशी खात्री दिली.
हृदयावरील शस्त्रक्रिया आठ ते दहा हजारात करण्याची ‘जितो’ची तयारी नसेल तर त्यांच्यावर मेहेरबानी का असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.
‘ठाण्यातील धर्मदाय कायद्यांतर्गत चालणाऱ्या रुग्णालयांत गोर-गरीब रुग्णांसाठी कधीच खाटा उपलब्ध नसतात. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मृत्यूची मालिका सुरूच आहे. खरे वाटत नसेल तर कोणीही या रुग्णालयास भेट देऊन खातरजमा करावी, असे आव्हान देत ‘ग्लोबल’चा उपयोग सर्वसामान्यांसाठी व्हावा असा आग्रह श्री. जाधव यांनी धरला आहे. ठाणेकरांनी मनसेच्या भूमिकेला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.