अकृषिक नोटिसांनी ठाणेकर हैराण

ठाणे: महसूल विभागाच्या लाखो रुपयांच्या थकबाकीच्या नोटिसांनी ठाणेकर चक्रावले असून या अकृषिक कराच्या कचाट्यातून कधी सुटका होणार याची चिंता लागली आहे. आमदार संजय केळकर यांनी यात लक्ष घालण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे.

ठाणे शहरात पूर्वी शेतीचा व्यवसाय असल्याने प्रत्येकाकडे सातबारा असे, पण आता वाढत्या नागरीकरणामुळे या जागी इमारती उभ्या राहिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून या भागांत रहिवाशांना अकृषिक कर भरण्याच्या नोटीसा देण्यात येत आहेत. या रकमा कोणीही भरत नसल्याने थकबाकीची डोंगर वाढतच आहे. अगदी ३०० फुटांच्या दुकानांनाही लाखोंच्या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

याबाबत अनेक रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली असून यातून सुटका करण्याची मागणी केली आहे. श्री. केळकर यांनी याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलून या नोटीसा अन्यायकारक असल्याचे निदर्शनास आणून दिले. या नोटिसांना स्थगिती देण्यात येणार असल्याची माहिती असून पुढील काळात घोरणात्मक निर्णय घेऊन हा अकृषिक कर कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याची माहितीही श्री.केळकर यांनी दिली.