माझ्या नजरेतून बदलते ठाणे उपक्रम
प्रवासी आणि शाळास्नेही शहरासाठी दक्ष ठाणेकरांचा आग्रह
ठाणे: रस्ते कामाच्या खर्चातून १० टक्के रक्कम परिवहन सेवेला द्या, या सेवेचे अपग्रेडेशन करून मॉलमधील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होण्याबाबत प्रयत्न व्हायला हवेत, अशा सूचना ठाणेवैभवचे संपादक तथा ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमात केल्या. यावेळी शाळा, वाहतूक कोंडी, घनकचरा आदी मुद्द्यांवरही मान्यवरांनी सूचना केल्या. आगामी अर्थसंकल्पात या सूचनांचा समावेश करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.
ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ठाणेकरांच्या सूचनांचा अंतर्भाव असावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सुरू केलेल्या ‘माझ्या नजरेतून बदलते ठाणे’ या उपक्रमाचे चौथे सत्र नुकतेच पार पडले. या चर्चासत्रात ठाणे जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ, सरस्वती शाळेचे विश्वस्त सुरेंद्र दिघे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर, दिव्यांग तसेच शरीरविक्रय करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या श्यामश्री भोसले, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदिश खैरालिया, नेत्रविकारतज्ज्ञ आणि आर. निसर्ग संस्थेच्या डॉ. लता घनश्यामनानी, प्लास्टिक विरोधी स्वयंसेवी संस्थेच्या अनुजा गुप्ते, पर्यावरण दक्षता मंचच्या सचिव संगीता जोशी, समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत, प्रवासी महासंघाचे सदस्य राजेश जाधव आदी उपस्थित होते.
ठाण्याचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे, शहरातंर्गत परिवहन सेवेकडे जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु लोकसंख्येच्या मानाने बसची कमतरता आहे, आपण शहरातील रस्ते मोठे केले असले तरी आपण परिवहन वाहतूक सेवा सक्षम केलेली नाही, त्यामुळे खाजगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. परिवहन सेवेचे अपग्रेडेशन झाले पाहिजे, बऱ्याचवेळा अनेक बसेस अचानकपणे रद्द होत असल्याने प्रवाशांची विशेषत: नोकरवर्ग, विद्यार्थी यांची गैरसोय होते, अशाप्रकारे बससेवा का रद्द होते व परिवहन सेवा अधिक सक्षम व्हावी यासाठी सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत प्रवासी महासंघाच्यावतीने मिलिंद बल्लाळ यांनी व्यक्त केले. तसेच परिवहनच्या ताफ्यात ई-बसेस आणून आपण आधुनिककीकरणाचा अवलंब केल्याबाबत त्यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त केले.
परिवहन सेवा सक्षम आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीकोनातून रस्तेकामासाठी खर्च होणाऱ्या रकमेतील 10 टक्के रक्कम बाजूला ठेवून त्याचा विनियोग परिवहन सेवेसाठी करावा. यामध्ये लोकसंख्येच्या मानाने बसेस उपलब्ध करणे, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावेत असेही श्री. बल्लाळ यांनी नमूद केले.
शहरामध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पार्किंग होत असल्याचे दिसून येते. आजही आपण पार्किंगबाबत मागे पडत आहोत. शहरातील मॉलमधील जागा पार्किंगसाठी उपलब्ध होईल का याबाबत संबंधितांशी चर्चा करुन पार्किंगची समस्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच तसेच शहरामध्ये मल्टिस्टोर पार्किंग उभारण्याबाबत या अर्थसंकल्पात तरतूद करावी. वाहतूकीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने सिग्नल व्यवस्था सक्षम करावी असेही यावेळी मिलिंद बल्लाळ यांनी नमूद केले.
शाळा महाविद्यालयांच्या वेळेनुसार विभागवार परिवहन सेवेचे नियोजन केल्यास त्याचा उपयोग निश्चितच शालेय विद्यार्थ्यांना होईल व साहजिकच शाळेपर्यत येणाऱ्या खाजगी वाहनांची संख्या कमी होईल या दृष्टीने नियोजन व्हावे असे सुरेंद्र दिघे यांनी नमूद केले. 20 वर्षानंतर ठाणे कसे असावे हे आजच्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून बघणे देखील गरजेचे आहे. यासाठी ठाण्यात भव्य बालभवन उभारल्यास विद्यार्थ्यांना हक्काची जागा मिळेल, त्यात खेळणीघर, रंगमंच आदी व्यवस्था असावी. तसेच ठाण्यात उभारलेले हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे रुपांतर बालभवनात करावे अशी सूचना सरस्वती शाळेचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे यांनी केली. ठाण्यातील विज्ञानकेंद्र कोरोना काळापासून बंद आहेत. ते पूर्ववत सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अशाप्रकारचे विज्ञान केंद्र प्रभागनिहाय असावे तसेच महापालिका शाळांमध्ये शिकवणीमुक्त शाळा, साहसी खेळ असे उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या.
पादचाऱ्यांच्या दृष्टीने शहरातील रस्ते, पदपथ यांची रचना असावी. सायकलस्नेही वाहतूक व्यवस्था तयार व्हावी, त्यासाठी जनसामान्यांच्या मानसिकतेत आमूलाग्र बदल घडून यावा लागेल, असे मत डॉ. महेश बेडेकर यांनी मांडले. ठाणे शहराचे स्वत:चे एक संग्रहालय असावे त्यासाठी पालिकेने प्रयत्न करावेत, असेही डॉ. बेडेकर म्हणाले.
यावेळी डॉ. लता घनश्यामनानी यांनी ध्वनी प्रदूषण, वाहतूक, घनकचरा, समता विचार प्रसारक संस्थेचे जगदीश खैरालिया यांनी वाचनालये, अभ्यासिका याबाबत सूचना केल्या. विद्यार्थ्याना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, महापालिका शाळांतील शिक्षकांना शिकवण्याचेच काम असावे असे मत समर्थ भारत व्यासपीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत यांनी व्यक्त केले. ठाण्यातील विशेष मुलांसाठी महापालिकेच्या माध्यमातून निवारा कार्यशाळा उभारण्याची गरज श्यामश्री भोसले यांनी व्यक्त केली.
या चर्चासत्रात मान्यवरांनी केलेल्या सूचनांचा समावेश अर्थसंकल्पात करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय होईल असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले.