ॲथलेटिक्स हा प्रसिद्ध ऑलिम्पिक खेळांपैकी एक खेळ आहे. ॲथलेटिक्स म्हणजे खेळांचा समूह. या समूहात धावणे, लांब उडी, उंच उडी, भालाफेक यासारख्या खेळांचा समावेश होते. मानवाच्या अंगी असलेल्या मूळ गुणांची ओळख करून देणारे हे खेळ आहेत. या खेळांचे वैशिष्ट्य म्हणजे याकरिता कुठल्याही महागड्या साधन-सामग्रीची गरज नसते. यापैकी बहुतांश खेळ आपण आपल्या शालेय जीवनात खेळलेले असतात. ॲथलेटिक्स हा खेळाचा प्रकार खूप चॅलेंजिंग आहे. बहुतेक वेळा वैयक्तिकरित्या खेळला जातो. ‘ट्रॅक अँड फील्ड स्पोर्ट्स’ या नावानेही हे खेळ ओळखले जातात. शरीर तंदुरुस्त राहते हा या खेळाचा महत्वाचा फायदा आहे. ठाणेकर इतर खेळांप्रमाणेच या खेळालाही आपलेसे करून घेत आहेत. ठाण्यात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील ॲथलेट्स घडले आहेत.
ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी
ठाण्यातील ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी ॲथलेटिक्स खेळासाठी प्रसिद्ध असलेली अकॅडमी आहे. ही अकॅडमी पंधरा वर्ष जुनी असून ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे अकॅडमीतर्फे सराव सुरु असतो. या अकॅडमीमधून अनेक राज्यस्तरीय, देशस्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ॲथलेट्स तयार झाले आहेत. वयाच्या पाचव्या वर्षापासून मुले या अकॅडमीमध्ये ॲथलेटिक्स शिकण्यासाठी प्रवेश घेऊ शकतात. येथे एकूण तीन प्रशिक्षक ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण देतात. यात एका महिला प्रशिक्षकेचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलाकडे व्यक्तीगतरित्या लक्ष दिले जाते. सुरुवातीला त्या मुलांचा रस नेमका कशात आहे ते ओळखून त्याप्रमाणे त्यांना कोचिंग दिले जाते. या अकॅडमीमध्ये सध्या पन्नासहून अधिक विद्यार्थी ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहेत.
अधिक माहितीसाठी
मी गेली अनेक वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे. मी एक नॅशनल लेव्हल ॲथलेट आहे. माझ्या काळात प्रशिक्षकांची संख्या कमी असल्याने कोचिंग क्षेत्र निवडले. ठाण्यात अनेक उत्तम ॲथलेट आहेत. त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे हा माझा ट्रॅक अँड फिल्ड ही अकॅडमी सुरु करण्यामागचा प्रमुख उद्देश होता. या अकॅडमीला पंधरा वर्ष झाली आहेत. माझ्या हाताखालून आत्तापर्यंत हजारो ॲथलेट्स तयार झाले आहेत. ॲथलेटिक्सचे अनेक प्रकार आहेत. यातील कोणत्या प्रकारात मुलांना रस आहे ते लक्षात घेऊन त्याप्रमाणे मुलांना प्रशिक्षित करणे या फिल्डमध्ये महत्वाचे आहे. ठाण्यासारख्या मोठ्या शहरात ॲथलेटिकच्या सरावासाठी लागणारे मैदान उपलब्ध नाही ही अत्यंत खेदाची बाब आहे. ठाण्यातील अनेक मुलांनी या क्षेत्रात अनेक विक्रम केलेले आहेत परंतु प्रॅक्टिससाठी लागणारे सिंथेटिक ट्रॅकही ठाण्यात उपलब्ध नाहीत. हे उपलब्ध झाल्यास ठाण्यात आणखी अनेक यशस्वी खेळाडू नक्कीच निर्माण होतील.
(दत्ता चव्हाण, प्रशिक्षक, ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी)मी सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा ठाणे या शाळेत शिकत आहे. मला ॲथलेटिक्स हा खेळाचा प्रकार आवडतो. कारण हा खेळ खूप चॅलेंजिंग आहे. आणि हा वैयक्तिकरित्या खेळला जाणारा खेळ आहे. यात आपण दुसऱ्याला चॅलेंज करून पुढे जातो. ॲथलेटिक्समुळे आपल्या शरीराची लवचिकता वाढते. मला लांब उडी (लॉन्ग जंप) मध्ये राज्य स्तरावर सुवर्णपदक मिळाले आहे. दत्ता चव्हाण सर, स्वप्नील सर आणि देसाई मॅडम या तिघांचाही मला खूप सपोर्ट आहे आणि माझ्या पालकांचाही मला खूप सपोर्ट आहे. ॲथलेटिक्समुळे आपलं माईंड खूप शांत राहतं. मला स्पर्धांमध्ये खूप चॅम्पियनशिप्स मिळाल्या आहेत. मला एक लॉन्ग जंपर व्हायचे आहे. अभ्यास आणि ॲथलेटिक्स दोन्हीचे योग्य नियोजन केल्यास कोणत्याच विषयात दुर्लक्ष होत नाही. आता माझी दुपारची शाळा आहे त्यामुळे मी रोज सकाळी प्रॅक्टिसला जाते.
(दीपिका संजय सखदेव, ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी)माझं वय आता 10 वर्ष असून मी वसंत विहार शाळेत शिकत आहे. मी माझ्या वयाच्या 6 व्या वर्षापासून ट्रॅक अँड फिल्ड मास्टर ॲथलेटिक क्लबचे दत्ता सर, स्वप्नील सर, देसाई मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ॲथलेटिकचा सराव करत आहे. त्यांच्यामुळेच मी गेली दोन वर्ष ॲथलेटिकमध्ये चांगली कामगिरी करू शकलो आणि सलग 4 वेळा प्रत्येक ॲथलेटिक स्पर्धेमध्ये वैयक्तिक चॅम्पियन ट्रॉफी मिळवली आहे. ॲथलेटिकमुळे आपल्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, आपली एकाग्रता वाढते. मी माझं एक करिअर म्हणून ॲथलेटिककडे पाहतो आणि मी यात भरपूर, सतत मेहनत करुन पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे.
(आराध्य सुहास पाटील, ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी)मला ॲथलेटिक हा खेळ खूप आवडतो आणि मी तो स्वतः निवडला आहे. मी आता सात वर्षांचा असून वसंत विहार शाळेत शिकत आहे. ॲथलेटिकमुळे डोक शांत राहतं, शरीर लवचिक राहते आणि जिंकण्याची जिद्द वाढते. मी गेल्या दीड वर्षापासून या अकॅडमीमध्ये खेळाचा सराव करत आहे. दत्ता सर, स्वप्नील सर आणि देसाई मॅडम खेळाची खूप चांगली प्रॅक्टिस करून घेतात आणि त्याचा फायदा मला होत आहे. मी माझा अभ्यास सांभाळून खेळाचा सराव करतो. मला आतापर्यंत ४ चॅम्पियनशिप मिळाल्या आहेत. पुढे मी अजून माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
(रूद्रांश राणे, ट्रॅक अँड फिल्ड अकॅडमी)
Aim स्पोर्टस् फाउंडेशन
ठाण्यातील Aim स्पोर्टस् फाउंडेशन या अकॅडमीने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत. ही अकॅडमी चोवीस वर्ष जुनी असून ठाण्यात प्राईड पाल्म्स ढोकाळी, सप्तश्री हाईट्स, लोढा अमारा वसंत विहार क्लब हाऊस शेजारी या अकॅडमीच्या इतर शाखा आहेत. सध्या ७०-८० खेळाडू येथे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहेत. येथील अनेक ॲथलेट्सनी करिअर म्हणून या फिल्डचा विचार केला आहे. श्रिया विद्वांस ही Aim स्पोर्टस् फाउंडेशनची पहिली इंटरनॅशनल ॲथलेट वर्ल्ड चॅम्पियन असून अमित प्रभू मास्टर इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आहे. ऋचा देशपांडे मास्टर वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळाडू, राष्ट्रीय पदक विजेता, सोहम दिवाडकर, स्वाती अय्यर, जान्हवी बेहेरे, अदा पठाण, अभिज्ञान निकम, आयुष पाटील, आयुष राठोड हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील ॲथलेट आहेत. येथील प्रत्येक खेळाडूला त्याच्या आवडीच्या ॲथलेट प्रकारचे कोचिंग दिले जाते. ठाणेकर खेळाडूंचा या अकॅडमीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मी गेली चोवीस वर्षे ॲथलेटिक्सचा प्रशिक्षक म्हणूण कार्यरत आहे. सध्या माझी स्वतःची अकॅडमी असून त्याआधी सतरा ते अठरा वर्ष मी स्वतः ॲथलेट म्हणून खेळत होतो. माझ्या आजोबांची ॲथलेट होण्याची इच्छा होती. त्यासाठी मी या क्षेत्राची निवड केली व नंतर हे क्षेत्र मला स्वतःला आवडू लागले. माझ्या अकॅडमीतील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर ॲथलेट आहेत. ॲथलेटिक्स म्हणजे फक्त धावणे नसून यात इतर अनेक खेळाचे प्रकार आहेत. ठाण्यात सिनारिक ट्रॅक नसल्यामुळे अनेकदा मुलांना सरावासाठी लांब जावे लागते व ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. ठाण्यात अनेक उत्तम कोचेस आहेत. जर असा ट्रॅक तयार केला गेला तर नक्कीच ठाण्यातून दहा नीरज चोप्रा तयार होतील. हा खेळ करिअर म्हणून सुद्धा निवडता येऊ शकतो. कोणत्याही खेळाची निवड केली तरी त्यात सातत्य असणे महत्वाचे आहे.
(डॉ. अजित कुलकर्णी, संस्थापक, Aim स्पोर्टस् फाउंडेशन)मी युनिवर्सल हायस्कूल ठाणे या शाळेत शिकत आहे. गेल्या आठ वर्षापासून मी ॲथलेटिक्सचा सराव करत आहे. मी विविध स्पर्धेत सहभागी होऊन जिंकले आहे. माझ्या प्रशिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केले. मी माझ्या प्रशिक्षकांच्या सहकार्याने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर खेळले आहे. मी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धाही खेळले आणि जिंकल्याही आहेत. माझे आई- बाबा मला खूप सपोर्ट करतात. मला भविष्यात एक उत्कृष्ट ॲथलेट व्हायचे आहे. ऑलिम्पिक साठी खेळायचे आहे. त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
(शौर्या अंबुरे, Aim स्पोर्टस् फाउंडेशन)मी गेल्या 20 वर्षांपासून अजित कुलकर्णी यांच्याकडे ॲथलेटिक्सचे प्रशिक्षण घेत आहे. मी पाचवीपासून ॲथलेटिक्स शिकायला व खेळायला सुरुवात केली. जिल्हास्तरीय, राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्यावर माझा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर माझा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि माझे व्यक्तिमत्व बदलले. माझ्यात आज जेवढा आत्मविश्वास निर्माण झाला आहे त्यापैकी 80 टक्के खेळामुळे आला आहे. खेळामुळे माझ्या जीवनात शिस्त आणि समर्पण अंगी आले आहे. मला आशिया पॅसिफिक मास्टर 2023 खेळात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. यात मी भारतासाठी तीन सुवर्णपदक पटकावले. मी नॅशनल लेव्हल स्पर्धांमध्येही खेळले आहे. त्यात मी तीन नॅशनल रेकॉर्ड केले आहेत. समर्पक वृत्ती, सातत्य, धोरणात्मक नियोजन, मानसिक शक्ती अंगी असल्यास तुम्ही तुमचे ध्येय नक्की गाठू शकता.
(डॉ . हेता ठक्कर राय, Aim स्पोर्टस् फाउंडेशन)
भोसले स्पोर्टस्
येथे ॲथलेटिक्स खेळासाठी लागणारे सर्व साहित्य मिळते. यामध्ये स्पोर्टस् जर्सी, पॅन्ट व इतर स्पोर्टस् वेअरचा समावेश होतो. तसेच येथे ॲथलेटिक्ससाठी लागणारे शूज सुध्दा उपलब्ध आहेत. यातही अनेक ब्रँड्स पहायला मिळतात.
कुठे – कळवा नाका, ठाणे