रस्त्यातील खड्डे आणि दुभाजकांनी ठाणेकर हैराण

ठामपा मुख्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन

ठाणे: पावसाळ्यात ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यांवर जागोजागी पडलेले खड्डे आणि विविध रस्त्यांवर अनावश्यक लावण्यात आलेले दुभाजक यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून ठाणेकर त्रस्त झाले आहेत. तर कमिशनबाजीमुळे रस्ते कामाचा दर्जा घसरल्याचा आरोप करत ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर काँग्रेसने आज जोरदार आंदोलन केले.

पावसाळा सुरु झाल्यानंतर काही दिवसांतच ठाण्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होऊन ठाणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून ठामपा मुख्यालयासमोर शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला.

या प्रसंगी प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी संतोष किणे, उपाध्यक्ष भालचंद्र महाडिक, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, महिला अध्यक्षा वैशाली भोसले, प्रदेश सदस्य जे.बी.यादव, शकीला शेख, महेंद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, रमेश ईदिसे, प्रवक्ते राहुल पिंगळे, रविंद्र कोळी, मंजूर खत्री, स्वप्नील कोळी, शिरीष घरत, चंद्रकांत मोहीते, प्रकाश मांडवकर आदीसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की, पावसाळ्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांबाबत पाहणी दौरा केला होता. जागोजागी खड्डेमुक्त ठाणे असे फलक लावण्यात आले होते, परंतु पहिल्याच पावसात रस्ते बांधकामाचा निकृष्ट दर्जा उघडा पडला. प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. जिथे जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता कामे करण्यात आल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते. रस्त्यांच्या कामात 16 टक्के कमिशन घेतले जात असून दर्जा कसा मिळणार? असा सवालही विक्रांत चव्हाण यांनी केला. अनावश्यक ठिकाणी लावण्यात आलेल्या दुभाजकांमुळे वाहतूककोंडी वाढत चालली आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.